पिडीत कुटुंबीयांसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
खोटे बनावट सह्या व अंगठे घेऊन जागा बळकाविण्याचा प्रयत्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- टोळी बनवून मागासवर्गीयांच्या जागा बळकाविणाऱ्या दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) येथील त्या दलालावर अनुसूचित जातीय कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी नामदेव आंग्रे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी आरपीआयचे ज्येष्ठ नेते संजय काबळे, आण्णासाहेब गायकवाड, सोन्याबापू सुर्यवंशी, लॉरेन्स स्वामी, विष्णू ठोंबे, मिलिंद आंग्रे, दिपक पाटोळे आदींसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. खोटे बनावट सह्या व अंगठे घेऊन तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हाताशी धरुन जागा बळकाविली जात असल्याचा आरोप आंग्रे यांनी केला आहे.
दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) या गावात जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या दलालाने 60 ते 65 वर्षाचे सात बाराचे पीक पाणीचे रेकॉर्ड एकाच दिवसात बदलून त्या जमिनीचे व्यवहार करतो. गावात त्याचा दरारा व वरदहस्त आहे. गावातील अनेक दलितांचे जमिनीचे व्यवहार नियमबाह्यरतीने त्याने केलेले आहेत. जागा बळकाविण्यासाठी त्याने मोठी टोळी निर्माण केली आहे.
यामध्ये पारनेर तहसील कार्यालयातील काही कर्मचारी देखील सहभागी आहेत. 2018 मध्ये चुलते बबन आंग्रे (रा.घोरपडी, जि. पुणे) यांच्या नावे पारनेर तहसीलदारांना एक टायपिंग केलेला अर्ज देण्यात आलेला आहे. त्यावर चुलत्याची खोटी बनावट सही करण्यात आली आहे. 6 जून 2018 चा हाताने लिहिलेला अर्ज आहे. यावर चुलत्याचा अंगठा देखील बनावट आहे. थोरले बंधू यांनी अमिष दाखवून त्यांचा लिहिलेल्या अर्जावर अंगठा घेतलेला आहे. स्वतःचा भाऊ देखील जागा बळकाविणाऱ्या त्या दलालाच्या टोळीतील सदस्य असल्याचा आरोप आंग्रे यांनी केला आहे.
सदर प्रकाराबाबत पारनेर तहसीलदार यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. याबाबत न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त नाशिक यांच्याकडे पाच ते सहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. माजी सैनिक असलेल्या स्वतःच्या भावाने या टोळीच्या माध्यमातून भाऊ-बहिणी यांच्याकडून शेतीच्या वादा करिता सर्वांच्या अधिकार पत्र घेण्याच्या नावाखाली त्यांच्या हिस्स्याच्या जमिन क्षेत्राचे खरेदी खताचा व्यवहारच करून घेतलेला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या प्रकरणात सदरचा दलाल व दुय्यम निबंध कार्यालयातील कर्मचारी सहभागी असून, मागासवर्गीयांच्या जागा बळकाविणाऱ्या दैठणे गुंजाळ येथील त्या दलालावर अनुसूचित जातीय कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन इतर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंग्रे यांनी केली आहे.
