जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियन व बँकेत करार
नगर (प्रतिनिधी)- शहरातील अंबिका महिला सहकारी बँक व अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियन यांच्यात नुकताच करार होऊन, बँक कर्मचाऱ्यांना 15% पगारवाढ देण्यात आली. 1 जुलै 2025 पासून हा वेतनवाढीचा करार पुढील 5 वर्षाकरीता असणार आहे.
वेतनवाढीच्या करारावर युनियनतर्फे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे, खजिनदार मुरलीधर कुलकर्णी, सह सचिव नितीन भंडारी, मॅनेजिंग कमिटी सदस्य संतोष मखरे, बँक व्यवस्थापनातर्फे संस्थापिका चेअरमन मेधाताई काळे, चेअरमन सरोजनी चव्हाण, व्हाईस चेअरमन ॲड. विजया काकडे, संचालिका शांता मोरे, सीईओ अंकुश गायकवाड यांनी सह्या केल्या.
या करारान्वये बँक व्यवस्थापनावर आर्थिक बोजा पडणार आहे. यामध्ये अतिरिक्त वेतनवाढ, महागाई भत्यात वाढ, बोनस, वाहन भत्ता, मेडिकल, शिक्षण या भत्यात वाढ करण्यात आली आहे. या कराराने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अंबिका महिला बँकेच्या मुख्य शाखेत वेतनवाढी कराराची बैठक पार पडली.
संस्थापक चेअरमन मेधाताई काळे यांनी अनेक वर्षापासून बँकेचे युनियनशी अत्यंत सौजन्याचे नाते असल्याचे स्पष्ट करुन महागाईचा विचार करुन कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धंनजय भंडारे यांनी महिला बँकेसह युनियनचे एक वेगळे ऋणानुबंध असून, कर्मचाऱ्यांसाठी एकमताने त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. कोणतेही मतभेद न ठेवता हा करार खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी युनियनच्या वतीने बँकेच्या संस्थापिका चेअरमन मेधाताई काळे यांचा सत्कार करुन त्यांचे आभार मानण्यात आले. तर बँक प्रशासनाच्या वतीने युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांचा सत्कार करण्यात आला.