41 वर्षानंतर माजी विद्यार्थी एकवटले
तरुण वयातील महाविद्यालयाच्या जुन्या आठवणीत झाले रममाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- तब्बल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर शहरातील न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे सन 1982 चे माजी विद्यार्थी रविवारी (दि.17 डिसेंबर) एकत्र आले. 41 वर्षानंतर आजी-अजोबा झालेल्या महाविद्यालयीन माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या जीवनातील गोड आठवणींना उजाळा दिला. उतारवयाकडे वाटचाल करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या मित्रांबरोबर एकच धमाल केली.
न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात 1982 च्या कला शाखेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. राज्याच्या विविध भागातून 60 पेक्षा अधिक माजी 60 विद्यार्थी-विद्यार्थिनी कार्यक्रमासाठी हजर होते. या स्नेहमेळावा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तर यावेळी त्याकाळी विद्यार्थ्यांना शिकवणारे माजी प्राचार्य खासेराव शितोळे, प्रा. मेघा काळे. प्रा. रामराव शेरकर, प्रा. तुकाराम वराट , प्रा. शहाजी उगले, प्रा. सोमनाथ दिघे, प्रा. अर्जुन गुरुनानी उपस्थित होते.
माजी प्राचार्य खासेराव शितोळे व इतर माजी अध्यापकांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना जणू वर्गच भरविला होता. 41 वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र आलेल्या जुन्या मित्रांना ओळखणेही अवघड झाले होते. या जुन्या सवंगडींनी एकत्र येत महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. आपले लाडक्या प्राध्यपकांशी देखील विद्यार्थ्यांनी मनमुराद गप्पा मारुन जुन्या आठवणी सांगितल्या.
उपस्थित मित्रांनी आपल्या भावना व्यक्त करुन जुन्या चांगल्या-वाईट आठवणीचा इतिहास मांडताना सर्वच भारावले. लांब गेलेले मित्र अंतराने कितीही लांब असले तरी, वर्ग मित्रांच्या स्नेहबंधाने जोडले गेले आहे. वर्गमित्र या नात्याची गोड शिदोरी जीवनभर राहणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित माजी प्राध्यापकांचा गौरवपूर्ण सन्मान केला. उपस्थित प्राध्यापकांनी 41 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांसह एकत्र आल्याचे कौतुक करुन जुन्या आठवणी सांगितल्या. दिवसभर महाविद्यालयात हा कार्यक्रम रंगला होता.
प्रास्ताविकात स्नेह मेळाव्याचे संयोजक यशवंत जगदाळे यांनी मुलांचे संसार थाटून, कुटुंबाची जबाबदारी पेलवून उतार वयाच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची भावना व्यक्त करुन सर्वांचे स्वागत केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग खेतमाळीस, भाऊसाहेब सोनावणे, बाळासाहेब कडूस, रोहिदास दातीर, नामदेव शेळके, प्रमिला टेकाडे, लता सोनावणे, माधुरी पाटेकर, शकुंतला लाटे, किशोर फंड यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिला टेकाडे यांनी केले. आभार रोहिदास दातीर यांनी मानले.