• Sun. Jun 1st, 2025

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत बोगस राजपूत भामटा आणि छप्पर बंद यांनी घुसखोरी केल्याचा आरोप

ByMirror

Sep 11, 2024

चौकशी करुन प्रवेशापासून वंचित राहिलेला योग्य विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी

गोर सेनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया 2024 मध्ये विमुक्त जाती प्रवर्गात बोगस राजपूत भामटा आणि बोगस छप्पर बंद यांनी घुसखोरी केली असल्याचा आरोप गोर सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. तर याप्रकरणी चौकशी करुन प्रवेशापासून वंचित राहिलेला योग्य विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गोर सेनेच्या शिष्टमंडळाने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. यावेळी गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष आर.के. चव्हाण, गोर गावळ्या जिल्हाध्यक्ष मोहन पवार, दुर्योधन जाधव, पि.टी. चव्हाण, श्‍याम पवार, अंबर चव्हाण, किशोर राठोड आदी उपस्थित होते.


एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयुएमएस, बीपीटी या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी 2024 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या यादीचे अवलोकन केले असता, एकूण 246 बोगस राजपूत भामटा आणि 66 बोगस छप्पर बंद विद्यार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. या लोकांमुळे मुळ भटके विमुक्त जमातीवर अन्याय होत आहे. सवर्ण आणि बिगर मागास असणाऱ्या लोकांनी या प्रभागात घुसखोरी केली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


खऱ्या भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील उमेदवारांना मेडिकल ॲडमिशनमध्ये प्रवेश मिळणे अशक्य झाले आहे. तर बोगस घुसखोरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फसवणुकीने जात वैधता प्रमाणपत्र हस्तगत केले आहे. याची तपासणी होणे आवश्‍यक असून, यामुळे भटक्या विमुक्त समाजातील 14 जातीच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. त्यामुळे खऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान दरवर्षी होत आहे. तरी प्राधान्याने या प्रकरणात गांभीर्याणे लक्ष घालून बोगस विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करावे व त्यांच्या जागेवर प्रवेशापासून वंचित राहिलेल्या योग्य विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी गोर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *