चौकशी पूर्ण होईपर्यंत बिले रोखण्यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा
मजूर फक्त मस्टरवर, प्रत्यक्षात मशिनद्वारे कामे; ठेकेदार व सरपंच यांचा संगनमताचा आरोप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत मौजे सावरगाव येथे सुरू असलेल्या शिवपानंद रस्ते व महात्मा गांधी रोजगार हमी योजना (रो. हा. यो.) अंतर्गत विहिरीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता सुरू असल्याचा गंभीर आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने केला आहे. या कामांबाबत संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदार व सेवकांचे कोणतेही बिल अदा करू नये, अशी मागणी समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर कामांची बिले अदा केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत योग्य कारवाई न झाल्यास दि. 26 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
समितीच्या निवेदनानुसार, सावरगाव येथील शिवपानंद रस्ते व रो. हा. यो. अंतर्गत विहिरीच्या कामात ठेकेदार, रोजगार सेवक व ग्रामपंचायतीतील संबंधित पदाधिकारी यांनी संगनमत करून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. प्रत्यक्षात कामे जेसीबी व पॉकलॅन्डसारख्या मशिनद्वारे केली जात असताना मजुरांची नावे केवळ मस्टर रोलवर दाखवून बिले काढण्यात येत आहेत. मस्टरवरील नावे ही सरपंच व रोजगार सेवकांच्या मर्जीतली असून, त्यातून 50 टक्के रक्कम मजुरांच्या नावावर तर उर्वरित 50 टक्के रक्कम ठेकेदार, रोजगार सेवक व सरपंच यांच्यात वाटली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिवपानंद रस्त्याच्या कामाबाबत शासनाच्या परिपत्रकाची सर्रास पायमल्ली होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे. रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी मुरूमाखाली खडी टाकणे बंधनकारक असताना ते न करता मनमानी पद्धतीने कामे सुरू आहेत. शासनाने शिवपानंद रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असला तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा गावकऱ्यांना होत नसून, केवळ बिले काढण्यासाठीच कामे दाखवली जात असल्याचा आरोप समितीने केला आहे.
तसेच रो. हा. यो. अंतर्गत सुरू असलेल्या विहिरीच्या कामाची स्थितीही अत्यंत बिकट असून, विहिरीची लांबी, रुंदी व मोजमाप निश्चित नसताना ठेकेदाराच्या मनमानी पद्धतीने मशिनद्वारे खोदकाम सुरू आहे. मजुरांच्या सहाय्याने काम केल्याचे दाखवून प्रत्यक्षात पॉकलॅन्डद्वारे कामे करून बिले उचलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
या सर्व प्रकरणाची चौकशी पारनेर पंचायत समिती स्तरावरून न करता, संबंधित विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच व ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याचा संशय व्यक्त करत जिल्हा परिषद अहिल्यानगर स्तरावर स्वतंत्र त्रिस्तरीय चौकशी समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, तसेच मजूर मस्टरवर खोटी नावे दाखवणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत शिवपानंद रस्ते व विहिरीच्या कामाचे कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये, अन्यथा संबंधित अधिकारी यास जबाबदार राहतील, असे समितीने स्पष्ट केले आहे. याबाबत कारवाई न झाल्यास 26 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे म्हंटले आहे.
