अन्यथा वेगळा विचार करण्याची कार्यकर्त्यांची भूमिका
महायुतीतील मित्रपक्षांविरोधात आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर – सुनिल साळवे
नगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला सत्तेत सहभाग व भाजपसह इतर मित्र पक्षांकडून सन्मानाची वागणुक मिळत नसल्याने प्रत्येक तालुक्यामधून नाराजीचा सूर आहे. हा रोष भाजप व मित्रपक्षांनी अंगावर ओढवून घेऊ नये. यासाठी महायुतीमधील मित्र पक्षांनी आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणुक द्यावी व श्रीरामपूरची जागा आरपीआयसाठी सोडण्याची सर्व कार्यकर्त्यांची मागणी असल्याची भावना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी व्यक्त केली.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रत्येक तालुकास्तरावर बैठका सुरु असून, शहरातील शासकीय विश्रामगृह येथे नगर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी साळवे बोलत होते. यावेळी आरपीआयचे नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, विवेक भिंगारदिवे, सिकंदर शेख, कविता नेटके, शोभा साळुंके, कृपाल भिंगारदिवे, दीपक क्षेत्रे, सुरेश अवसरे, अविनाश उमाप, सुरज भिंगारदिवे, करण सोनवणे, अजय उमाप, संदेश पाटोळे, दानिश शेख, अस्लम शेख, प्रा. गोरख अंबरीत, मुन्ना शेख, शिवाजी साळवे, गणेश कदम, बाळासाहेब नेटके, रोहिदास साळुंके, अनिल बर्डे, युसुफ शेख, विलास सांबवण, जयराम आंग्रे आदी आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे साळवे म्हणाले की, आरपीआय ज्या मित्र पक्षांबरोबर असते, ते पक्ष सत्तेत येतात. स्वत: पावशेरची भूमिका घेऊन मित्रपक्षांना सव्वाशेर करण्याचे काम आरपीआय करत आहे. मात्र त्यांना सत्तेत वाटा देताना दिलेला शब्द पाळण्यात आलेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

अविनाश भोसले म्हणाले की, तालुक्यातील आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते फक्त खांद्यावर झेंडे घेण्याचे काम करणार नाही. हा पक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणार पक्ष असून, प्रत्येक कार्यकर्त्याला आत्मसन्मान आहे. आंबेडकरी जनतेने ठरविल्यास तो उमेवार निवडून आणू शकते, तर वेळप्रसंगी पाडू देखील शकते. याची जाणीव प्रत्येक मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवावी. नगर तालुका विधानसभेच्या इतर मतदारसंघात विभागला गेला आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनतेची ताकद आहे. विश्वासात न घेतल्यास वेगळा विचार केला जाणार असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी आरपीआयला गृहीत धरताना त्यांचा मान-सन्मान होणे अपेक्षित असल्याचे सांगितले.
विवेक भिंगारदिवे यांनी सर्व समाजातील मोठा युवक वर्ग आरपीआयमध्ये कार्यरत आहे. पक्षातील युवक मोठ्या उमेदीने व प्रामाणिकपणे महायुतीचे काम करत आहे. मात्र त्यांच्या सन्मानाला ठेस लागल्यास युवा वर्गाच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याची भूमिका मांडली.
या बैठकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भावना जाणून घेण्यात आली. महायुतीच्या मित्रपक्षांकडून सन्मान मिळत नाही, शासकीय कार्यक्रमांचे निमंत्रण मिळत नाही, पक्षाला गृहीत धरुन राजकारण केले जाते, कोणत्याही निर्णयामध्ये विचारात घेतले जात नसल्याचा कार्यकार्त्यांमधून नाराजीचा सूर यावेळी उमटला. विधानसभेत सत्तेत वाटा व मानसन्मान न मिळाल्यास सर्व आरपीआयच्या माध्यमातून आंबेडकरी जनता एका विचाराने व वेगळ्या भूमिकेने कार्य करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
–
राहुरी येथे मंगळवारी (दि.15 ऑक्टोबर) होणाऱ्या केंद्रीय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांच्या सन्मान सोहळ्यासाठी आरपीआयच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे. राहुरी येथे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ना. आठवले यांचा सन्मान होणार आहे. या सोहळ्यासाठी संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, राजाभाऊ कापसे, भीमा बागुल, सुरेंद्र थोरात, बाळासाहेब गायकवाड, दीपक गायकवाड, पप्पू बनसोडे उपस्थित राहणार आहेत.
