• Tue. Jul 22nd, 2025

विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी कोतवाली पोलीसांनी पतीला ताब्यात घेऊन सोडल्याचा आरोप

ByMirror

May 21, 2024

मयताच्या नातेवाईकांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

तपास संशयास्पद असून, आरोपींना अटक करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- विवाहित महिलेच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यापूर्वी आरोपी असलेल्या पतीला ताब्यात घेऊन सोडून दिल्याप्रकरणी कोतवाली पोलीसांच्या तपासावर मयताच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त करुन पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी मयताची आई माया हिरामण डंबाळे, बाजीराव भिंगारदिवे, आशिष डंबाळे, आकाश डंबाळे आदी उपस्थित होते.


अर्चना अमोल गायकवाड हिने 6 मे रोजी नवरा घरात असताना गळफास घेतला. घटनास्थळी गेलो असता, तिचा नवरा तेथून पळून गेला. त्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशन गेल्यानंतर पोलीसांनी पंचनामा व शवविच्छेदन केल्यानंतर गुन्हा दाखल करू, असे सांगितले. त्यावेळी पोलीसांनी तात्पुरत्या स्वरूपात मयताचा नवरा अमोल गायकवाड याला अटक करण्यात आली होती. पण कोणतीही माहिती न देता कोतवाली पोलीसांनी त्याला परस्पर सोडून दिले व नंतर दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


या गुन्ह्यात योग्य तपास होत नसल्या कारणामुळे आरोपी व सह आरोपी गुन्हा करून फरार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी विचारणा केली असता, योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुलीचा कौटुंबिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारा तिचा पती व आरोपी असलेल्या नातेवाईकांवर कारवाई करुन तात्काळ अटक करण्याची मागणी मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *