सह्याद्री छावा संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
संचालक व चेअरमन यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रशांत सहकारी गृहनिर्माण संस्थेत सभासदांनी पैसे भरूनही बेकायदेशीर पद्धतीने नोटीस पाठवून पैसे उकळले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित संचालक व चेअरमन यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन दिले असून, या मागणीची दखल न घेतल्यास 26 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही संस्था तालुका उपनिबंधक यांच्या आशीर्वादाने काम करत असून, अनेक सभासदांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे.
सभासदांनी एकदा पूर्ण पैसे भरूनही त्यांना पुन्हा बोगस नोटीस पाठवून रक्कम भरण्यास भाग पाडले जात आहे.
जमिनीची किंमत 20 ते 30 लाख रुपयांपर्यंत गेल्याने सभासदांचे वारस नोटीसीला बळी पडून गप्प पैसे भरून प्लॉट नावावर करत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. संस्थेवर कोणत्या अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे याबाबतही संभ्रम असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीतील अधिकारी या संस्थेत कार्यरत असून, सभासदांना उडवा-उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. कागदपत्रांची मागणी केल्यास आमच्याकडे उपलब्ध नाहीत! असे सांगून त्यासाठीही पैशांची मागणी केली जात असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. यामुळे सभासद व त्यांचे वारस या संस्थेमार्फत सातत्याने लुटले जात असल्याचा ठपका संघटनेने ठेवला आहे.
संघटनेने प्रशांत सहकारी गृहनिर्माण संस्थेची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच सभासदांच्या वारसांची सुरू असलेली लूट तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.