सुनिल साळवे यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड
श्रीरामपूरच्या जागेवर रिपाईचा दावा
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले) शहरात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दक्षिण जिल्हा कार्यकारिणीसह सर्व आघाडी व विभागाच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या. रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी (दि.19 ऑगस्ट) झालेल्या बैठकीत कार्यकारिणी बरखास्तचा निर्णय घेऊन सुनिल साळवे यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर आगामी विधानसभा व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली.
या बैठकीसाठी विजय बांबळ, किरण दाभाडे, विवेक भिंगारदिवे, अजय साळवे, नाथा भिंगारदिवे, रमेश गायकवाड, महादेव मगरे, रवींद्र आरोळे, सुरेश भागवत, रवी दामोदरे, दत्ता दत्ता, आरती बडेकर, जयाताई गायकवाड, मायाताई जाधव, बाळासाहेब शिंदे, पै. अविनाश भोसले, बाबा राजगुरू, सतीश मगर, सतीश भैलुमे, विशाल घोडके, संतोष केदारी, कविता नेटके, अंकुश भैलुमे, अशोक शिरसिम, सतीश साळवे, युवराज गायकवाड, सुजित धनवे, गौरव साळवे, बंटी गायकवाड, प्रमोद घोडके, पप्पू घोडके, लखन भैलुमे, सागर कांबळे, कुंडलिक गंगावणे, दीपक कांबळे, सोनवणे मामा, जयराम आंग्रे, वंदना भिंगारदिवे, मंगल भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, शिवाजी साळवे, चंद्रकांत ठोंबे, चंद्रकांत भिंगारदिवे, सदाभाऊ भिंगारदिवे, संदीप घोडके, शशिकांत पाटील, शिरुभाऊ दौंडे, काळोखे मामा आदींसह दक्षिण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजय वाकचौरे म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुती मधील घटक पक्ष असताना देखील सत्तेतील सहभागापासून वंचित राहिला आहे. महायुतीमध्ये रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. त्यांना सत्तेचा वाटा हवा आहे. लोकसभा निवडणुकीत रिपाईला सन्मानाची वागणूक मिळाली नाही, म्हणून आंबेडकरी समाजाने महायुतीच्या उमेदवारांवर रोष काढला परिणामी दक्षिण लोकसभा व शिर्डीचा जागा गमवावी लागली. महाराष्ट्रात विधानसभेसाठी आरपीआयला 12 जागा सोडाव्या, यामध्ये एक श्रीरामपूरच्या जागेचा समावेश असून, तेथे बौद्ध उमेदवार दिला जाणार आहे. महायुतीत सत्तेत सहभाग व सन्मानाची वागणूक न मिळाल्यास वेगळी वाट धरू व वेळप्रसंगी स्वतंत्र पर्याय उभा केला जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
श्रीकांत भालेराव म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून सुनील साळवे काम पाहणार आहे. ऑक्टोंबर मध्ये पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नवीन कार्यकारणी जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले.
महायुतीत घटक पक्ष म्हणून काम करताना रिपाईच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान दिला जात नाही व त्यांना धोरणात्मक निर्णय घेताना विश्वासात घेतले जात नाही. रिपाईला यापुढे गृहीत धरून चालता येणार नाही. मान-सन्मान न मिळाल्यास रिपाई आपले राजकीय अस्तित्व दाखवून देणार आहे. विधानसभेसाठी श्रीरामपूरची राखीव जागा आरपीआयला सोडण्याची सर्व आंबेडकरी चळवळीची मागणी असल्याची भूमिका भालेराव यांनी स्पष्ट केले.
सुनील साळवे म्हणाले की, पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असून, टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार आहे. गाव तेथे शाखा स्थापन करुन मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी केली जाणार आहे. संघटनात्मक बदल करताना नवीन व जुने पदाधिकाऱ्यांचा मेल बसवून आणि सर्वांना विश्वासात घेऊन सक्रीय सभासदांना संधी देण्याचे काम केले जाणार आहे. कोणत्याही पदाधिकाऱ्याशी वैयक्तिक वाद नसून, पक्ष बळकट व्हावा हेच ध्येय समोर ठेऊन कार्य केले जाणार आहे. रिपाईची दक्षिणेत नव्या दमाने पक्ष बांधणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.