जय श्रीरामच्या घोषणेसह गावात रंगली मिरवणुक
कार सेवा केलेल्या गावातील सुपुत्राचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाची नेप्ती (ता. नगर) गावात बँडच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. तर कार सेवेत सहभागी असलेले गावाचे सुपुत्र विष्णू गुंजाळ यांचा सन्मान करण्यात आला.
नेप्ती फाटा येथून अक्षता कलश मिरवणुकीला प्रारंभ झाला संत सावता महाराज चौक, मुंजोबा चौक, श्रीराम चौक मार्गे संपूर्ण गावात अक्षता कलशासह प्रदक्षिणा घालण्यात आली.
मिरवणुकीच्या स्वागतासाठी महिलांनी घरा समोर सडा, रांगोळी टाकल्या होत्या. गावातील युवकांनी रामजी की निकली सवारी…., भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा…, श्रीराम जानकी बैठे है मेरे सिनेमे… या गाण्यावर ठेका धरला होता. जय श्रीरामच्या घोषणेने गावाचा परिसर दणाणून निघाला.

नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने अक्षता कलशाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने कार सेवक विष्णू गुंजाळ यांचा सन्मान करण्यात आला. विष्णू गुंजाळ म्हणाले की, 6 डिसेंबरला 1992 रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व लालकृष्ण अडवाणी यांच्या विचाराने प्रेरित होऊन कार सेवा केली. पुण्याला कामानिमित्त जात असल्याचे सांगून घर सोडले.
आयोध्येतून चार विटा आणून शहराचे तत्कालीन आमदार स्व. अनिल राठोड यांच्या सहकार्याने ग्रामस्थांनी त्याच विटाचा वापर करून राम मंदिर बांधले. ऊन, वारा व थंडीची परवा न करता 12 दिवस घर सोडून जीवावर उदार होऊन कार सेवा केल्याचे त्यांनी सांगितले.
