लब्बैक या हुसेनच्या घोषणांनी शहर दणाणला
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात प्रसिद्ध असलेली नगरची मोहरम शांततेत व उत्साहात पार पडली. बुधवारी (दि.17 जुलै) काढण्यात आलेली इमामे हसन-हुसेन यांच्या सवाऱ्यांची विसर्जन मिरवणूक, तसेच मोहरमच्या नऊवीनिमित्त मंगळवारी (दि.16 जुलै) कत्तलच्या रात्रीची मिरवणूक शांततेत पार पडली.
मोहरम निमित्त कोठला परिसरात सवारींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंगळवारी रात्री 12 वाजता कोठला येथील छोटे बारा इमाम यांची सवारी उठल्यानंतर कत्तलची रात्र मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी मानाचे पाच टेंबे पेटविण्यात आले होते. मंगलगेट हवेली येथून मोठे बारा इमाम यांची सवारी उठली. कत्तलची रात्र मिरवणूक दाळमंडई, तेलीखुंट, कापडबाजार, मोची गल्ली, भिंगारवाला चौक, पंचपीर चावडी, बांबू गल्ली, रामचंद्र खुंट, इदगाह मैदान मार्गे कोठला येथे बुधवारी सकाळी सवारी परत आपल्या जागेवर बसवण्यात आली. पुन्हा दुपारी 12 वाजता कोठला येथील हमामे हुसेन यांची सवारी उठवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाले.
या मिरवणुकीदरम्यान जिल्हा पोलिस दलाच्यावतीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. चौका-चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. तर संवेदनशील भागात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. संपूर्ण मोहरम मार्गावर पोलिसांनी बॅरिकेटींग करत चोख बंदोबस्त ठेवला.
कोठला येथून छोटे बारा इमाम (इमामे हुसेन) यांची सवारी हवेली येथे आल्यानंतर मोठे बारा इमाम (इमामे हसन) यांची सवारी देखील उठविण्यात आली. इमामे हसन-हुसेन या दोन्हींच्या सवाऱ्या हवेली येथून एकत्रित बाहेर पडल्या. मंगल गेट येथे दोन्ही सवारी एकत्र आले असता, भाविकांनी एकच जल्लोष केला. मिरवणुक पाहण्यासाठी व सवारींच्या दर्शनासाठी सर्व धर्मिय बांधवांनी मोठी गर्दी केली होती. चौका-चौकात भाविकांना सरबतचे वाटप करुन सवारीवर चादर अर्पण करण्यात आली. या हुसेन… या हुसेन.., लब्बैक या हुसेनच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून निघाले.

जुना बजारच्या पुढे संध्याकाळी सवारीच्या दर्शनासाठी भाविकांची अशरक्ष: झुंबड उडाली होती. पाच सरबतच्या गाड्या जुन्या महापालिके पर्यंत मिरवणुकीत सहभागी होत्या. भाविकांना यावेळी सरबतचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीत सवारीबरोबर ताजिया व सवारीवर मोरचण मारणारे बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौका-चौकात युवकांनी सवारी खेळवली. सायंकाळी उशिरापर्यंत पंचपीर चावडी, जुनी महापालिका, सबजेल चौक परिसरात रेंगाळली होती. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मिरवणूक मार्गस्थ झाली. 8:54 मिनीटांनी सवारी दिल्लीगेटच्या वेशी बाहेर पडली. रात्री उशीरा परंपरेनुसार सावेडी परिसरातील विहिरीत सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले.