सभासदाच्या उपचारासाठी कर्जाची रक्कम वेळेत न दिल्याचा निषेध
सोसायटीच्या अनागोंदी कारभाराचा व निष्क्रियतेचा धिक्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- दवाखान्यातील उपचारासाठी माध्यमिक शिक्षक सोसायटीत दाखल केलेले सभासदाचे कर्ज प्रकरण मंजूर झाल्याचे सांगून, त्या व्यक्तीच्या मरेपर्यंत कर्जाची रक्कम रोखून धरल्याच्या निषेधार्थ विरोधी संचालक व न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाच्या प्राध्यापक, प्राध्यापिकांनी माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर निदर्शने केली. सोसायटीच्या अनागोंदी व निष्क्रियतेचा निषेध नोंदवून धिक्कार करण्यात आला.
या आंदोलनात विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे यांच्यासह न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना दारकुंडे, प्रतिभा पवार, स्वाती ससे, कुर्नुलकर, मुळे मॅडम, शारदा साठे, आशा रोकडे, अर्चना कोहोक, प्रीतम पवार, कविता उगले, स्वाती कलापुरे, जयश्री शेळके, रंजना पठारे, मंदा कराळे, स्वाती दोशिंगे, कैलास कोरके, सुभाष गोरे, दिनकर मुळे, संजयकुमार कोतकर, दादासाहेब महारनवर, रवींद्र पायमोडे, सचिन जासूद, राहुल कानवडे, जयश्री भालसिंग, पठारे मॅडम, कराळे मॅडम आदींसह शिक्षक, प्राध्यापक सहभागी झाले होते.
सविता लक्ष्मण भुसाळ या रुईछत्तीसी (ता. नगर) येथील न्यू आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात विनाअनुदानित तत्वावर कार्यरत होत्या. मागील दोन वर्षापूर्वी त्या शहरातील न्यू आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात अनुदानित तत्वावर रुजू झाल्या. मात्र त्या कर्करोगाने ग्रस्त झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी काही दिवसांपूर्वी विळद घाट येथील विखे पाटील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.
कॅन्सरच्या उपचारासाठी त्यांनी यापूर्वी देखील सोसायटीतून कर्ज घेतले होते. मात्र मोठ्या प्रमाणात पैसे लागत असल्याने उपचारासाठी त्यांच्या स्वाक्षरीने 10 लाख रुपयाच्या कर्ज रोख्यासाठी दोन जामीनदार असलेल्या त्यांच्या सहकारी प्राध्यापिका व त्यांच्या पतीच्या उपस्थितीमध्ये शनिवारी (दि.2 सप्टेंबर) सकाळी माध्यमिक शिक्षक सोसायटीत अर्ज दाखल करण्यात आला. यावर सोसायटीकडून कर्ज मंजूर झाले असून, पैसे खात्यात वर्ग केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे पती व सहकारी प्राध्यापिका निश्चिंत होवून तेथून निघून आल्या. परंतु सोमवारपर्यंत पैसे खात्यात वर्ग झाले नाही. त्यामुळे सोमवारी महाविद्यालयातील पर्यवेक्षक गोरे यांनी कर्ज मंजूर न झाल्याने सोसायटीत फोन केला. त्यानंतर दवाखान्यात दाखल असलेल्या संस्थेचे सभासद भुसाळ यांच्या स्वाक्षऱ्या जुळत नसल्याचे कारण देण्यात आले. त्यावर ते गंभीर आजारी असल्याने स्वाक्षरीत थोडा-फार बदल होणे साहजिक असल्याचे स्पष्टीकरण देवून देखील सोसायटीकडून हॉस्पिटल मधील ॲडमीट कार्ड आणण्याचे सांगण्यात आले. परंतु त्यावेळी त्यांच्या कर्जाच्या फॉर्मवर जामीनदार व साक्षीदार असलेल्या सर्व सभासद बंधू-भगिनी समक्ष सह्या करून हजर सुद्धा होत्या. तरीसुद्धा संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीनूसार त्यांच्या सहकारी प्राध्यापिकेने धावपळ करून हॉस्पिटल मध्ये जावून ॲडमीट कार्ड आणून दिले. तरीदेखील सोसायटीने कर्जाचे पैसे त्यांच्या खात्यात वर्ग केले नाही. शेवटी पैश्याअभावी त्यांचा डिस्चार्ज घेवून मुळगावी नवलेवाडी (ता. अकोले) येथे घेवून जाण्यात आले. घरीच त्यांचा उपचाराअभावी दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या सहकारी प्राध्यापिकांनी दिली.
आंदोलनात सहभागी झालेल्या सहकारी प्राध्यापिकांना या दुर्देवी घटनेने रडू कोसळले. कर्जदार जिवंत असताना व मंजूर झालेले कर्ज भुसाळ परिवाराला तात्काळ देण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली. त्या महिलेला योग्य वेळी संस्थेकडून सभासद या नात्याने हक्काचे पैसे मिळाले नसले तरी, त्यांच्या मृत्यूनंतर त्या पैश्यातून त्यांच्या मुला-मुलींचा शिक्षणाचा खर्च भागवता येणार आहे. यासाठी त्या हयात असताना मंजूर झालेले कर्ज त्यांच्या कुटुंबीयांना देण्याची मागणी उपस्थितांनी केली. अन्यथा माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर सत्ताधारी संचालक मंडळाच्या मनमानी व नियमबाहय कामकाजाच्या विरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विरोधी संचालकांनी भुसाळ यांच्या मृत्यूस सोसायटीच्या संचालक मंडळास जबाबदार धरुन जोरदार घोषणाबाजी केली. सोसायटीत उपस्थित असलेले तज्ञ संचालक भाऊसाहेब कचरे यांनी संताप व्यक्त करुन, शांत होण्याचे सांगताच विरोधी संचालक व तज्ञ संचालकामध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली.
सोसायटीचा कारभार दीड वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या व तज्ञ संचालक म्हणून सोसायटीत घेतलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन चालत आहे. सभासद असलेल्या एका प्राध्यापिकेला उपचारासाठी पैसे उपलब्ध करुन न दिल्याचे जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या कर्ज प्रकरणाच्या अर्जात त्रुटी होत्या, तर शनिवारीच त्यांचे सहकारी प्राध्यापिका व नातेवाईकांना सांगणे गरजेचे होते. मात्र त्यांना कर्ज मंजूर झाल्याचे सांगण्यात आले व शेवट पर्यंत पैसे देण्यात आले नाही. जिवंतपणी केलेले कर्ज प्रकरण मरणानंतर देखील सभासदाच्या खात्यात वर्ग केलेले नाही. सभासदांनी टाकलेल्या विश्वासाचा सत्ताधारी मनमानी कारभाराने खून करत आहे. त्या प्राध्यापिकेच्या कर्जाची रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना देवून मरणानंतर तरी न्याय द्यावा अशी भूमिका विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे यांनी मांडली आहे.
