गुणवंत विद्यार्थी समाजाचे भूषण -अनिल शिंदे
प्रत्येकी 5 हजार रुपये बक्षीस देऊन 30 गुणवंतांचा सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळ समाजातील होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभे आहे. संस्थेच्या वतीने सातत्याने गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. गुणवंत विद्यार्थी समाजाचे भूषण असून, त्यांना दिशा देण्याचे काम केले जात असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव अनिल शिंदे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत 93 टक्कयांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याप्रसंगी शिंदे बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब डोके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, उपाध्यक्ष बाबासाहेब गिरवले, सहसचिव बाळकृष्ण काळे, खजिनदार विनायकराव गरड, विश्वस्त जयंत वाघ, रमाकांत गाडे आदींसह पालक व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, मागील चार वर्षापासून सातत्याने मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जात आहे. पहिल्या वर्षी 2 नंतर 3 आणि सध्या 5 हजार रुपये प्रत्येकी गुणवंतांना देण्यात आले आहे. पुढील वर्षापासून प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांना 11 हजार रुपये देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे प्रारंभ करण्यात आले. प्रास्ताविकात सहसचिव बाळकृष्ण काळे यांनी समाजाला दिशा व आधार देण्याच्या उद्देशाने 1975 साली या सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली आल्याचे स्पष्ट करुन, सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते 93 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या 30 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये, सन्मानपत्र, गुलाबपुष्प व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
बापूसाहेब डोके म्हणाले की, ग्रामीण भागातील मुले-मुली विशेष गुण प्राप्त करून पुढे येत आहे. यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे. पालक व शिक्षक त्यांना वळण देऊन योग्य मार्ग दाखविण्याचे काम करत आहेत. समाजसेवेसाठी संस्था कटिबद्ध असून त्या दिशेने कार्य सुरु आहे. समाजाची शिक्षणातून प्रगती साधली जाणार आहे. कुणबी प्रमाणपत्राचा पुरेपूर फायदा गुणवंत विद्यार्थ्यांनी घ्यावा. ध्येयनिश्चित करा ते प्राप्त करण्यासाठी सातत्याने वाटचाल करण्याचे व तंत्रज्ञान क्षेत्राकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले.
पुढील वर्षी गुणवंतांना प्रत्येकी 11 हजार रुपये बक्षीस देण्यासाठी रमाकांत गाडे यांनी 1 लाख 1 हजार, बापूसाहेब डोके व अनिल शिंदे यांनी प्रत्येकी 51 हजार रुपये देण्याचे जाहीर केले. आभार जयंत वाघ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत कदम यांनी परिश्रम घेतले.