• Tue. Jul 22nd, 2025

एमआयडीसी, बोल्हेगाव, नागापूर भागातील अवैध धंदे बंद होण्यासाठी रिपाई महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा

ByMirror

Dec 15, 2023

अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षकांच्या दारी उपोषणाचा इशारा

संसाराची राखरांगोळी थांबविण्यासाठी अवैध धंद्यांवर कारवाईची केली मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी, बोल्हेगाव, नागापूर भागातील अवैध धंदे बंद करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडी सरसावली असून, महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. तर युवक जुगार व व्यसनाच्या आहारी जात असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत असून, अवैध धंद्यांवर कारवाई न करणाऱ्या पोलीसांमुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


यावेळी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, सोनाली भाकरे, ललिता ठोंबरे, सोनाली पवार, अर्चना भाकरे, सुशिला भाकरे, अलका भाकरे, स्वाती भाकरे, सोनाली भाकरे, सुशिल पगारे, साई साळवे, अमृता पवार, रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, सुधीर गायकवाड, अनिकेत पवार, दानिश शेख आदी उपस्थित होते.


एमआयडीसी, बोल्हेगाव, नागापूर भागात मटका, जुगार, गांजा, हातभट्टी, दारू, बिंगो, सोरट यांसारखे अनेक अवैध धंदे अनेक वर्षापासून सुरू आहे. यामुळे अनेक युवक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. जुगाराच्या नादी लागून अनेक कंगाल झाले असून, यामुळे अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले आहे. याचा महिला व लहान मुलांना मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी देखील या प्रश्‍नासंदर्भात रिपाई महिला आघाडीच्या वतीने अनेकवेळा पाठपुरावा करुन व उपोषण करुन देखील कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. तर अवैध धंदे करणाऱ्यांना पोलीस प्रशासन कलेक्शनच्या नावाखाली अभय देत आहेत का? हा प्रश्‍न उपस्थित केला आहे.


एमआयडीसी, बोल्हेगाव, नागापूर भागातील अवैध धंदे पोलीस प्रशासनाने कारवाई करुन बंद न केल्यास परिसरातील सर्व महिला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 17 डिसेंबर पासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *