भारतीय जनसंसदची मागणी; उपायुक्तांना निवेदन
1982 सालापासून आप्पूहत्तीशी नगरकरांचे जिव्हाळ्याचे नाते
नगर (प्रतिनिधी)- शहराच्या लालटाकी परिसरातील आप्पूहत्तीचा पुतळा रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीनंतर आहे, त्याच जागेवर पुनरस्थापना करण्याची मागणी भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी भारतीय जनसंसदच्या शिष्टमंडळाने मनपाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
याप्रसंगी राज्य अध्यक्ष अशोक सब्बन, जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे, शहराध्यक्ष रईस शेख, तालुका अध्यक्ष पोपटराव साठे, बबलू खोसला, केशव बरकते, वीरबहादुर प्रजापती, विजय शिरसाठ, शिवाजी बेलोटे, कैलास पठारे, नलिनी गायकवाड, ॲड. विद्या जाधव-शिंदे, अजित कटारीया, दिलीप घुले, संगीता खिलारी, विनय, अंबादास जाधव, बाळासाहेब पालवे, राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते आदी उपस्थित होते.
1982 साली भारतामध्ये प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धा दिल्ली येथे भरविण्यात आल्या होत्या. तत्कालीन नगरपालिकेने त्यावेळेस असलेले प्रशासक कॅप्टन अशोक पुरोहित यांनी नव्याने रुंदीकरण दुरुस्त केलेल्या आणि विकसित उपनगराकडे जाणाऱ्या लालटाकीच्या मुख्य रस्त्यावरच्या चौकामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचे बोधचिन्ह असलेल्या आप्पूहत्तीची प्रतिकृती बसवली होती. सध्याच्या रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीमध्ये ही प्रतिकृती काढून टाकून, त्या ठिकाणी काही वेगळे विकासात्मक चौक करणार असल्याचे निदर्शनास येत आहे. असा काहीसा नवीन विकास करण्यासाठी हरकत नाही, पण त्या जागेवरती आशियाई क्रीडा स्पर्धेची 1982 ची आठवण जपणाऱ्या आप्पूहत्ती स्मारकाची जपणूक करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
गेल्या किमान दोन पिढ्यांपासून नगरकरांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेल्या त्याच नावाने चौकाची ओळख असलेल्या आप्पूहत्तीची प्रतिकृती रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या प्रतिमेस नव्याने झळाळी देऊन पुनरस्थापना करण्याची मागणी भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे.