अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे व छपराचे घर पेटविणाऱ्या आरोपींवर कारवाईची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन पीडीत मुलीच्या कुटुंबीयांच्या छपराचे घर पेटविणाऱ्या आरोपींवर पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याने कर्जत तालुक्यातील पीडीत कुटुंबीयांनी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. तर या गुन्ह्यातील आरोपींपासून जीवाना धोका असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी घरकुल मिळण्याच्या मागणीचे निवेदन पीडीत कुटुंबीयांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना दिले.
कर्जत तालुक्यात पीडित कुटुंबीय राहत असून, शेतमजुरी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. त्यांच्या 13 वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी सन 2022 मध्ये अंकुश जामदार व कुंडलिक गोयकर यांच्यावर कर्जत पोलीस स्टेशनला अपहरण, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे.
हा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींकडून दबाव आणला जात आहे. 30 एप्रिल 2024 रोजी रात्री आरोपींनी पिडीत कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या उद्देशाने राहत असलेल्या छपराचे घर पेटवून दिले. वेळीच कुटुंबातील सदस्यांना आग लागल्याचे कळाल्याने सर्व सदस्य सुखरुप बाहेर पडले. मात्र घरातील संसार उपयोगी जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाले. या प्रकरणी देखील आरोपींवर पिडीत कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींकडून पीडित कुटुंबीयांच्या जिवीताला धोका असून, आरोपींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे असताना देखील त्यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.
आर्थिक दुर्बल व मागासवर्गीय असल्याने प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असून, घर जळाल्याने उघड्यावर जीवन जगावे लागत असताना प्रशासनाने न्याय देऊन घरकुल उपलब्ध करुन कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे. अन्यथा कर्जत प्रांत कार्यालय परिसरात महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
