खंदरमाळवाडी येथील आदिवासींच्या जमीनीवर नांगर फिरवून होणार आंदोलन
मूळ आदिवीसा बांधवांसह पीपल्स हेल्पलाईन संघटनेचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- बिगर आदिवासींनी आदिवासींच्या लाटलेल्या जमीनी परत मिळवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनने जारी केलेल्या काळी आई मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून खंदरमाळवाडी (ता. संगमनेर) त्या जमीनीवर नांगर फिरवून आंदोलन केले जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली. तर खंदरमाळवाडी येथे आदिवसी शेतकरींच्या जमीनीवर कब्जा करणाऱ्यांकडून मुळ आदिवासींना त्यांच्या जमीनी परत मिळण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.
संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील मुळा नदी शेजारची गट नंबर 775 मधील 10 हेक्टर 62 जमीन मूळ आदिवासींच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन बिगर आदिवासी असलेले शंकर महादू तांगडकर यांनी त्यांची बायको विमल शंकर तांगडकर यांच्या नावावर 2 हेक्टर 57 आर जमीन फक्त फेरफार करून लाटली. शासन निर्णयाप्रमाणे बिगर आदीवासी व्यक्तींना महसुल विभागाच्या परवानगीशिवाय जमीन घेता येत नाही. तरी देखील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन हा व्यवहार झाला.
तर भिमाजी दूधवडे यांचा मूळ जमीन मालकांच्या जमिनीत कोणताही हक्क व हितसंबंध नसताना 2 हेक्टर 5 आर जमीन लाटली गेली. त्याशिवाय त्यांचा मुलगा रामदास दुधवडे यांच्या नावावर 82 आर जमीन फक्त फेरपार आणि हस्तांतरित केली. त्याशिवाय चिमा दूधवडे यांच्या नावावर 50 आर, जानकू दूधवडे यांच्या नावावर 48 आर आणि मना दूधवडे यांच्या नावावर 80 आर फक्त फेरफारने आणि हस्तांतरित केली. सन 1990 साली त्या गावाचे तलाठी आणि सर्कल यांना हाताशी धरून बनावट आणि खोटा फेरफार नंबर 535 बनविण्यात आला आणि सरकारी परवानगीशिवाय खरेदी खताशिवाय एकूण 10 हेक्टर 62 आदिवासींची जमीन लाटण्यात आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
मूळ जमीन मालकांपैकी गेणुभाऊ दुधवडे यांच्या नावावर 80 आर व सोमनाथ दुधवडे यांच्या नावावर फक्त 40 हजार जमीन ठेवण्यात आली. मूळ जमीन मालक आदिवासी भिकेला लागलेले असून, उपासमारीने त्रस्त आहेत. स्वतंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा आदिवासी कल्याण कायदे सरकारला राबवता आले नाहीत. त्यामुळे आदिवासी मूळ जमीन मालकांनी संघटनेच्या पुढाकाराने आंदोलन जारी केले आहे. या आंदोलनासाठी भास्कर गणपत दुधवडे आणि किशोर गेणूभाऊ दुधवडे यांनी पुढाकार घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
