आदिवासी विकास कृती पंचक राबविण्याचा पीपल्स हेल्पलाईनचा निर्णय -ॲड. कारभारी गवळी
अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिवासींनी सामाजिक न्याय मिळण्याच्या उद्देशाने लाटण्यात आलेल्या त्यांच्या जमीनी परत मिळवून देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनने आदिवासी काळी आई मुक्ती आंदोलन जारी केले आहे. तर आदिवासी विकास कृती पंचक राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचा प्रारंभ मंगळवारी (दि.12 सप्टेंबर) खंदरमाळ वाडी (ता. संगमनेर) होणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
महसूल न्याय विक्रीमुळे महाराष्ट्रातील आदिवासींच्या हजारो बागायती जमिनी बिगर आदिवासींनी सरकारी परवानगीशिवाय किंवा फक्त फेरफार करून लाटल्यामुळे हजारो आदिवासी कुटुंबांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा दारिद्य्रात रहाण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील आदिवासींना इतर समाजाबरोबर पुढे जाण्याची संधी मिळावी म्हणून आदिवासी विकास कृती पंचक राबविण्यात येणार आहे.
संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील गट नंबर 775 मधील 9.62 आर जमीन बिगर आदिवासींनी फक्त फेरफारच्या माध्यमातून लाटल्यामुळे अनेक आदिवासींना दारिद्य्राच्या खाईत खितपत पडावे लागले आहे. आदिवासी कल्याणकारी कायदे सरकारने केले, परंतु आदिवासी अशिक्षित व असंघटित असल्यामुळे महसूल खात्याच्या तलाठी, सर्कल यांनी आदिवासींच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा सातत्याने घेतला. खंदरमाळवाडी येथील 9.62 आर जमीन लाटण्यासाठी फक्त फेर नंबर 535 मंजूर करून बिगर आदिवासींनी तलाठी आणि सर्कल यांच्या मदतीने ही जमीन लाटली. त्यामुळे आदिवासींना आदिवासी काळी आई मुक्ती आंदोलन पुकारले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दुबळ्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृती पंचक दिले होते. आदिवासी विकास कृती पंचकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासींना नक्कीच चांगले दिवस येऊ शकणार आहे. शिक्षण, संघटित संघर्ष, उन्नत चेतना, कायद्याच्या माध्यमातून क्रांती करता येते याची जाणीव ठेवणे त्याशिवाय इतरांपेक्षा कमी नसून, आपण देखील सर्वच बाबतीत यशस्वी होवू शकतो, असा प्रत्येक आदिवासींच्या मनात विश्वास निर्माण करणे हा कृती पंचकांचा गाभा असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.
2004 साली महाराष्ट्रात क्रांतिकारक कायदा आला आणि पुढील 30 वर्षात आदिवासींना बिगर आदिवासींनी लाटलेल्या जमिनी परत मिळण्याचा अधिकार देण्यात आला. त्यामुळे आदिवासींनी देखील संघटित होऊन आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी संघटित होवून आंदोलन केले पाहिजे. हा आदिवासी विकास कृती पंचाकांचा मुख्य विषय आहे. ही कृतीपंचक राबविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचे ॲड. गवळी, भास्कर दूधवडे, किशोर दूधवडे आदींसह आदिवासी बांधव प्रयत्नशील आहेत.
