लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तटकरे यांची महत्त्वाची भूमिका -मारुती पवार
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवून महिलांचा सन्मान वाढविल्याबद्दल महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचा सन्मान करण्यात आला. मुंबई येथे राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अहमदनगर राष्ट्रवादी सोशल मीडिया विभागाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष मारूती पवार यांनी तटकरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अख्तर शेख, किशोर शेलार, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.
मारूती पवार म्हणाले की, माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचा मान-सन्मान वाढला आहे. सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे वर्ग होत असून, त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले गेले आहे. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. उत्तम प्रकारे नियोजन व जाचक अटी कमी करुन त्यांनी महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. यामुळे सर्वच बहीणी आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले.