शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 3 ऑक्टोबरला महापालिके समोर करणार धरणे आंदोलन
महापालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाची फाईल लालफितीच्या कारभारात अडकली -एन.एम. पवळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महापालिका कामगार युनियनच्या वतीने सोमवार (दि.2 ऑक्टोंबर) पासून निघणाऱ्या नगर ते मंत्रालय (मुंबई) पायी लाँग मार्चला महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब महासंघ व अहमदनगर महापालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने सक्रीय पाठिंबा देण्यात आला आहे. सोमवारी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व पेन्शनर्सच्या लाँग मार्चला पाठिंबा देण्यासाठी सिध्दार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर उपस्थित राहणार आहे. तर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 3 ऑक्टोबरला महापालिके समोर धरणे आंदोलन करणार आहे.
जिल्हा परिषद येथील दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, उपाध्यक्ष वसंत थोरात, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, पेन्शनर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डी.यु. देशमुख, उपाध्यक्ष डी.एन. कोंडा, सुदीप पडवळ, दत्ता रणसिंग, सुहास धीवर, नंदाताई भिंगारदिवे, एल.के. जगताप, मधुकर खताळ, आर.के. गावडे, दिलीप पाठक, रफिक शेख, वसंत गायकवाड, अन्वर शेख, रामचंद्र कदम, साहेबराव बोरगे, इम्तियाज शेख, मंजूर शेख, रामदास वाखारे, अनिस पठाण, भास्कर पेरणे, दिगंबर टेकाळे, सुदाम मोरे, संजू उमाप, शांताबाई शेकटकर, सुशीला शेलार, मुस्ताक शेख आदी उपस्थित होते.
महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, लाड समितीच्या शिफारशीनुसार मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नेमणूका द्याव्या या दोन प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महापालिका कामगार युनियनचा सोमवारी लाँग मार्च निघणार आहे. यामध्ये महापालिकेतील शंभर टक्के कर्मचारी सहकुटुंब सहभागी होत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देवून संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सर्व पेन्शनर्स देखील उतरणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मंगळवारी महापालिकेतील सर्व पेन्शनर्स प्रलंबीत मागण्या व महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार आहेत. पेन्शनर्सना वयोमानानूसार लाँग मार्च मध्ये सहभागी होता येत नसले तरी, ते मुंबई येथे होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभाग नोंदविणार आहेत.
एन.एम. पवळे म्हणाले की, इतर नगरपालिका व महापालिका कर्मचारी व सरकारी कार्यालयातील सर्वांना सातवा वेतन आयोग देण्यात आला आहे. मात्र अहमदनगर महापालिकेचे कर्मचारी यापासून वंचित आहे. अनेक वेळा पाठपुरावा करुन देखील हा प्रश्न सुटलेला नाही. सातव्या वेतन आयोगाची फाईल शासन दरबारी लालफितीच्या कारभारामध्ये अडकली आहे. शासन दरबारी धडक देवून हा प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही संघटना प्रयत्नशील आहेत. या लाँग मार्चनंतर मुंबईला होणाऱ्या धरणे आंदोलनात दोन्ही संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर संघटनेच्या सर्व सदस्य व पेन्शनर्सना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
