• Thu. Jan 29th, 2026

कर्जुनेखारे, निमगाव घाणा, देहरे, पिंप्री, नागापूर येथील हातभट्टी दारु व्यावसायिकांवर कारवाई व्हावी

ByMirror

Mar 6, 2024

राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालया समोर उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुनेखारे, निमगाव घाणा, देहरे, पिंप्री, नागापूर व इतर गावात अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई करुन सदरचे अवैध व्यवसाय कायमचे बंद होण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी अनिल गायकवाड, अंकुश अभंग, संतोष तेलोरे, सचिन लोखंडे, शिवाजी लांडगे आदी सहभागी झाले होते.


राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एम.एम. राख व दुय्यम निरीक्षक एच.एस. बोबाटे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई सुरु असल्याचा खुलासा केल्याने उपोषण मागे घेण्यात आले. ढवळे यांनी नुकतीच ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जाणीवपूर्क खाद्यपदार्थांच्या हातगाडी वाल्यांना त्रास देवून अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांना पाठिशी घालत असल्याची तक्रार केली होती. यानंतर राज्य उत्पादनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात 36 हातभट्टयांवर कारवाई केली.


गेल्या अनेक वर्षापासून हातभट्टी दारु बंद होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांनी मोर्चा नेऊन स्थानिक ग्रामपंचायत, पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देवून दारु बंदीची मागणी केलेली आहे. मात्र गावात हातभट्टी दारु विक्री सर्रासपणे सुरु आहे. प्रत्येक गावामध्ये चार ते पाच हातभट्टी दारूचे धंदे असून, यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. हातभट्टी दारु पिऊन अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. कितीतरी युवक व्यसनाच्या आहारी जात असून, गावात सुरु असलेल्या हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई करुन सदरचे अवैध व्यवसाय कायमचे बंद करण्याची मागणी ढवळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *