खोडसाळपणातून एमआयडीसी मधील कंपनीत घडली होती घटना
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील एका कंपनीत प्रिन्सकुमार या तरुणाला कामाच्या वेळेतच त्याच्या सहकाऱ्यांनी एअर प्रेशर मशीनच्या साहाय्याने गुदद्वारात हवा भरल्याने गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपीस उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे.
दि. 7 सप्टेंबर 2024 रोजी, क्लासीक व्हील कंपनीमध्ये मयत प्रिन्सकुमार आपल्या मित्रांसोबत फिटिंग लाईनवर काम करत होता. त्या ठिकाणी आरोपी रोशनराज व दिपक सिंग हे एअर प्रेशर ग्रॅडिंग मशीनवर काम करत होते. अचानक प्रिन्सकुमार जमिनीवर कोसळून वेदनेने ओरडू लागला. सहकारी धावून आले आणि विचारणा केली असता, प्रिन्सकुमारने सांगितले की, रोशनराज व दिपक सिंग यांनी त्याचे हात पकडून एअर प्रेशर मशीनने त्याच्या गुदद्वारात जोरात हवा भरल्याचे सांगितले.
फिर्यादी प्रतीक संजय सकट यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, प्रिन्सकुमार बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीवर आला नाही आणि काही वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या धक्कादायक प्रकारानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 105, 125, 125(अ), व 125(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आणि सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
प्रथम सत्र न्यायालय, अहमदनगर येथे आरोपी रोशनराजने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲड. शशिकांत शेकडे यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला.
न्यायालयाने यावर निर्णय देताना नमूद केले की, घटना प्रथमदर्शनी जाणीवपूर्वक केल्याचे दिसून येत नाही. ही खोडसाळपणातून घडलेली बाब वाटते. या निरीक्षणावर आधारित निर्णयात रोशनराजला 50,000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणात आरोपीच्या बाजूने ॲड. शशिकांत शेकडे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. पृथ्वीराज ढाकणे, ॲड. रोहित नरवाडे, ॲड. विशाल थावरे, ॲड. व्यंकटेश हिंगमीरे यांचे सहकार्य लाभले.