शहराच्या तोफखाना हद्दीतील मारहाण प्रकरण
नगर (प्रतिनिधी)- अंतर्गत वादातून महिलेस मारहाण केल्याच्या खटल्यातून आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. मंगळवारी (दि.08 जुलै) हा निकाल देण्यात आला.
12 फेब्रूवारी 2021 रोजी फिर्यादी धुण्याभांड्याचे कामकाज करून गंगा उद्यान शेजारील रस्त्याने पायी घरी जात असताना लक्ष्मी मातेच्या मंदिरासमोर पती सोबत काम करणारा आरोपी आला व फिर्यादीस म्हणाला की, माझ्यासोबत बुऱ्हाणनगरला चल! असे म्हंटल्यावर फिर्यादीने नकार दिला व तिच्या पतीला फोन केला. सदर प्रकार सांगणार तेवढ्यात आरोपीने तिचा फोन हिसकावून घेतला. सदर गोष्टीचा आरोपीस राग आल्याने आरोपीने रागात फिर्यादीच्या तोंडावर बुक्का मारला तसेच हातातील लोखंडी कड्याने तोंडावर मारून तिचे दात पाडून तिला रक्तबंबाळ केले. सदर प्रकार कोणास सांगितला तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणुन तिथुन पळून गेला. अश्या आशयाची फिर्याद तोफखाना पोलिस स्टेशन येथे दाखल करून भा.द.वी. कलम 324, 325, 326, 506 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. संपूर्ण प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले.
साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व आरोपीच्या वतीने ॲड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी घेतलेला उलटतपास आणि मांडलेला बचावात्मक युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा नसल्याने व सरकार पक्ष आरोपी विरुद्ध केस सिध्द करू न शकल्याने न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी तर्फे ॲड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी काम पाहिले व ॲड. गणेश शेटे यांनी त्यांना सहकार्य केले.
