नुकसान भरपाईपोटी फिर्यादीने आरोपीची गाडी डांबून ठेवून चेक घेतल्याचे झाले सिध्द
नगर (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेश येथील हरित भारत नर्सरी यांच्याकडून नगर जिल्ह्यात मागविण्यात आलेली आंब्याची रोपे वेळेत प्राप्त न झाल्याने ती वाळली. त्याच्या नुकसान भरपाईपोटी आरोपी यांच्या मालकीचे वाहन फिर्यादी यांच्या घरी डांबून ठेऊन चेक घेण्यात आले. धनादेश वटला नसल्याने दाखल झालेल्या गुन्ह्यातील प्रकरणात सुनावणी होवून फिर्यादीने आरोपीची गाडी डांबून ठेवून चेक घेतले व सदरची खोटी केस दाखल केल्याचे सिद्ध झाल्याने आरोपीचे फिर्यादीस कोणतीही रक्कम देण्याची कायदेशीर जबाबदारी नसल्याचे स्पष्ट करुन 60 हजार रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
फिर्यादी दत्तू गवाजी गवळी यांनी उत्तर प्रदेश येथील हरित भारत नर्सरी यांच्या आंब्याच्या रोपांची निवड केलेली होती. सदर नर्सरीचे मालक संदीप शुक्ला यांच्याशी चर्चा करून सातशे आंब्यांच्या रोपांची मागणी केली. संदीप शुक्ला यांनी 1 ऑक्टोबर 2022 रोजी 700 झाडे आरोपीच्या मालकीची ट्रक मध्ये पाठवल्या. याबाबत फिर्यादी यांना कळविले. नर्सरी मालक यांनी आंब्याचे झाडे उशिरा मिळाले असतील तर घेऊ नका, असे कळविले होते. सदर ट्रक लखनऊ येथून आंब्याचे रोपे घेऊन 3 ऑक्टोंबर 2022 रोजी फिर्यादी यांच्याकडे पोहोचणे जरुरीचे होते, परंतु सदर गाडीच्या तांत्रिक अडचणीमुळे आंब्याचे झाडे घेऊन निघालेला ट्रक 10 ऑक्टोबर रोजी फिर्यादीच्या गावी पोहोचले. त्यावेळी फिर्यादीने आंब्याचे रोपांची पाहणी केली असता सदरचे रोपे वाळलेले असल्यामुळे सदरचे रोप घेण्यास स्पष्ट नाकार दिला. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी ट्रकचे मालक फिर्यादीच्या गावी आले व त्यांना 1 लाख 70 हजार रुपय चेकद्वारे देण्याचे मान्य व कबूल करून फिर्यादी यांना रोख रक्कम 50 हजार दिले. उर्वरित रक्कम 1 लाख 20 हजार च्या मोबदल्यात आरोपीचे खाते असलेल्या सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा कोथरूड पुणे या बँकेचे चेक रक्कम 60 हजार रुपयाचा चेक दिला.
आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये 16 नोव्हेंबर रोजी तडजोडीचा करारनामा झाला. त्यानुसार सदर फिर्यादी यांनी रोपांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आरोपी यांच्या मालकीचे वाहन घरी डांबून ठेवलेले होते, ते आरोपी यांच्या ताब्यात दिले. सदरचे फिर्यादी यांनी 60 हजार रुपयाचा चेक वटवण्यासाठी त्यांचे खाते असलेल्या इंडियन ओवरसीज बँक शाखा अरणगाव येथे भरला असता, समोरील व्यक्तीच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने बाऊन्स झाला. फिर्यादी दत्तू गवळी यांनी अहमदनगर येथील मे. चीफ ज्युडिशिअल यांच्या न्यायालयात आरोपीविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट चे कलम 138 अन्वये फिर्याद दाखल केली. सदर फिर्यादीची गुणदोषावर चौकशी करून आरोपीचे फिर्यादीस कोणतीही रक्कम देण्याची कायदेशीर जबाबदारी नसून, फिर्यादीने आरोपीची गाडी डांबून ठेवून चेक घेतले व सदरची खोटी केस दाखल केल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. सदर प्रकरणात फिर्यादीच्या वतीने ॲड.पी.जी. मोरे, ॲड. देवा थोरवे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. सुभाष वाघ यांनी सहकार्य केले.