• Wed. Jul 2nd, 2025

कर्तृत्ववान महिलांचा आजचा अहिल्या पुरस्काराने गौरव

ByMirror

Jun 3, 2024

अहिल्यादेवी होळकर जयंती महिलांच्या सन्मानाने साजरी

आरोग्यासाठी आयुर्वेद ही फार मोठी देणगी -संजीवनी तोडकर

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांनो स्वतःचे आरोग्य जपा, स्वतःच्या आरोग्यकडे लक्ष द्या. किरकोळ तक्रारीकडे दुर्लक्ष न करता स्वयंपाक घरात असलेल्या विविध पदार्थांच्या माध्यमातून उपचार करता येतात. निसर्गाच्या माध्यमातून आरोग्यासाठी आयुर्वेद ही फार मोठी देणगी लाभलेली असल्याचे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ञ तथा व्याख्यात्या संजीवनी स्वागत तोडकर यांनी केले.


अहिल्या फाउंडेशन, अहिल्या मेकओव्हर, नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने माऊली संकुल सभागृहात झालेलुया पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन करताना तोडकर बोलत होत्या. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना आजच्या अहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शासनाचा आदर्श युवा पुरस्कार विजेते ॲड. महेश शिंदे, आंतरराष्ट्रीय मेकप आर्टिस्ट अलका गोविंद, अहिल्या अहिल्या मेकओव्हर संचालिका डॉ. कावेरी कैदके, सुवर्णा कैदके, प्राचार्य वैशाली कोरडे, आरती शिंदे, राजेंद्र टाक, केतन ढवण आदी उपस्थित होते.


पुढे तोडकर म्हणाल्या की, कुंकू लावतात त्यामागे शास्त्रीय कारण आहे. कुंकू लावायच्या जागेवर 30 सेकंद मसाज केल्यावर डोकेदुखी थांबते. पूर्वी गोंदण केले जायचे, ते पॉईंट्स काढून केले जात होते. त्याचा शरीराला लाभ व्हायचा. पूर्वी मंगळसूत्र वाट्यांची असायची त्यामुळे थायरॉईडचा त्रास होत नव्हता. काचेच्या बांगड्यामुळे गर्भाशयाचा त्रास कमी होणे, चांदीचे पैंजणमुळे शरीरातील उष्णता कमी होणे असे पूर्वीची परंपरा शास्त्राला धरुन होती, असे त्यांनी सांगितले. तर आरोग्य जपण्याचा महिलांना त्यांनी व्याख्यानातून कानमंत्र दिला.


ॲड. महेश शिंदे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर या चाणाक्ष, क्षमाशील, शांत, चातुर्य व दूरदर्शी असल्याने त्यांनी आदर्श राज्य चालवले. सर्व धर्म समभाव, अस्पृश्‍यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती, रूढी परंपराचा बिमोड केला. समाज सुधारण्याचे कृतीशील कार्य आहिल्यादेवी यांनी केले. आजच्या युवतींनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे त्यांनी आवाहन केले. अलका गोविंद यांनी महिला व युवतींना ब्युटी क्षेत्रातील करियरच्या वाटा या विषयावर मार्गदर्शन केले.


प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देवकन्या भालेराव, डॉ. रेणुका पाठक, प्राचार्या ज्योत्स्ना शिंदे, प्रमिला गावडे, हेमा सेलोत, डॉ. रेखा सानप, स्वाती समुद्र, सुलक्षणा वाघमारे, वृषाली सारसर, सुवर्णा साठे, ज्योती भिटे, सुवर्णा पवार, अश्‍विनी केदारी, अलका गोविंद आदींना आजच्या अहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.


कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयांतर्गत शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, जिल्ह्यातील ब्युटीशियन, गृहिणी व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले. आभार कावेरी कैदके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *