• Sat. Nov 1st, 2025

शाळा दत्तक योजना व कंपनीकरण निर्णय रद्द करा

ByMirror

Oct 24, 2023

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची शिक्षणाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

शिक्षण व्यवस्था उध्वस्त होण्याची भिती व्यक्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळा दत्तक योजना व कंपनीकरण निर्णय रद्द होण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. गोरगरिबांच्या शिक्षणाच्या वाटा बंद करणारा जाचक शासन निर्णय रद्द होण्यासाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना निवेदन देण्यात आले.


या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, संभाजी पवार, महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, बद्रीनाथ शिंदे, प्रशांत साठे, गणेश जाधव, रंगनाथ जाधव, बी.एस. काकडे, अविनाश घोरपडे, सहादू कटारे, शिवाजी नरसाळे, हरिश गाडे, प्रशांत गावडे, अशोक झिने, ज्ञानदेव बेरड आदींसह शिक्षक, शिक्षकेतर सहभागी झाले होते.


शासनाने कंत्राटी करण्याचा निर्णय रद्द केल्याची घोषणा केलेली आहे. हे सर्व शिक्षक संघटनेच्या आंदोलनाचे यश असल्याचे स्पष्ट करुन सर्व शिक्षक, शिक्षकेतरांचे संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. मात्र दत्तक शाळा योजना कंपनीकरणातून जिल्हा परिषद शाळांचे नियंत्रण संचालन याविषयी शालेय शिक्षण विभागाने 18 सप्टेंबर 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार घेतलेले निर्णय संबंधी शासनाने भूमिका स्पष्ट केलेली नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


6 सप्टेंबर रोजी खाजगी कंत्राटदार संस्था पॅनलला मंजुरी दिली व 18 सप्टेंबर रोजी दत्तक शाळा योजनेच्या आदेशामुळे संपूर्ण राज्यभर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यामुळे गोरगरिबांच्या शिक्षणाच्या वाटा बंद होऊन व्यापारीकरण झाल्याने ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. अशाप्रकारे शिक्षण व्यवस्था उध्वस्त झाल्यास खाजगी मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा सुद्धा धोक्यात येणार असल्याची भिती संघटनेच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व समविचारी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. हा निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *