सर्व पक्षीयांचे आयुक्तांच्या दालनात ठिय्या
शहरातील ताबा राज हटविण्याच्या घोषणा
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका प्रशासनाने पस्तीस ते चाळीस वर्षापासून अस्तित्वात असलेल्या स्वस्तिक चौकातील जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टची गणेशोत्सवाच्या मंडप उभारण्याची परवानगी नाकारुन एक वर्षापूर्वीच्या मंडळास परवानगी दिल्याने सर्व पक्षीयांच्या वतीने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना घेराव घालून ठिय्या देण्यात आला. तर राजकीय वरदहस्त असलेल्या त्या ताबा मारणाऱ्या गणेश मंडळाला हटवून जनजागृती मित्र मंडळाला परवानगी देण्यासाठी आयुक्तां समोर गणपतीची आरती करण्यात आली. तर शहरातील ताबा राज हटविण्याच्या घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, काँग्रेसचे किरण काळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर, संजय झिंजे, दिलीप सातपुते, विक्रम राठोड, भाजपचे अभय आगरकर, वसंत लोढा, सचिन जाधव, संभाजी कदम, पै. सुभाष लोंढे, महेश लोंढे, गुंदेचा, गौरव ढोणे, बंटी ढापसे, ओंकार शिंदे, आशिष (मुन्ना) शिंदे आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शहराच्या स्वस्तिक चौकातील गणेशोत्सवासाठी दोन मंडळांनी एकाच जागेवर दावा केल्याने वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या अनेक वर्षा पासून असलेल्या जनजागृती मित्र मंडळास महापालिकेने परवानगी नाकारुन एक वर्षापूर्वीच्या मंडळास परवानगी दिल्याने हा वाद आनखी चिघळला आहे.
पस्तीस ते चाळीस वर्षापासून असलेल्या मंडळाला परवानगी नाकारुन, अवघ्या एका वर्षाच्या मंडळाला परवानगी दिल्याने उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. लोकप्रतिनिधीच्या राजकारणाला बळी पडून हा निर्णय घेतल्याचा आरोप करुन आयुक्तांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. राजकीय दबावाखाली देण्यात आलेल्या त्या मंडळाच्या परवानगी रद्द करण्याची मागणी लावून धरण्यात आली. या संदर्भात निर्णय होत नाही, तो पर्यंत आयुक्तांच्या दालनातून हटणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. गणपती बाप्पा मोरया!… च्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.
दरवर्षी प्रमाणे ठरलेल्या जागेत गणपती मंडळ उभारण्याची भूमिका मंडळाच्या वतीने घेण्यात आली आहे. महापालिकेने परवानगी नाकारल्यास नगर-पुणे महामार्गाच्या रस्त्याच्या दुभाजकावरच मंडप उभारण्याचा इशारा अनिल शिंदे यांनी दिला आहे. तर जनजागृती मित्र मंडळ हे ट्रस्ट असून धर्मदाय आयुक्त यांच्या परवानगी घेऊन महापालिकेत परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव मंडळाच्या परवानगीच्या प्रकरणाने महापालिकेत चांगलेच वातावरण तापले होते. आयुक्तांनी दुपारपर्यंत वेळ द्या परवानगीचा प्रश्न मार्गी लावण्याचे स्पष्ट केले. मात्र संतप्त आंदोलकांनी तातडीने निर्णय देण्याचा पवित्र घेऊन निर्णय येत नाही, तोपर्यंत आयुक्तांच्या दालनातून बाहेर जाणार नसल्याची भूमिका घेतली होती. दुपारी उशीरा पर्यंत आंदोलक आयुक्तांच्या दालनात ठाण मांडून होते.
