मनपा सफाई कर्मचारी ब्राह्मणांकडून करत असलेल्या पैशांच्या मागणीविरोधात लेखी तक्रार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी विधी करण्यासाठी येणाऱ्या ब्राह्मणांकडून पैशांची बेकायदेशीर वसुली करत असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात आम आदमी पार्टीकडून महापालिका आयुक्तांना लेखी तक्रार दिली असून, तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी हे नियमित वेतन, बोनस व सुविधा महापालिकेकडून घेत असताना, ते अमरधाम येथे विधी करण्यासाठी येणाऱ्या ब्राह्मणांकडून पैशांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. पैसे न दिल्यास संबंधित कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ, अरेरावीची भाषा आणि पूजेला न येऊ देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
एका घटनेत, पद्माकर बापुराव मुळे हे विधीसाठी अमरधाम येथे आले असता त्यांच्यासोबतही अशीच घटना घडली. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना पाचशे रुपये देऊ केले, मात्र कर्मचाऱ्यांनी ते पैसे नाकारून हजार रुपयेच द्या! अशी मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विधी करणाऱ्या ब्राह्मणांकडून पैशांची मागणी करणे अत्यंत चुकीचे आहे. अशा प्रकारांवर तातडीने निर्बंध आणून महापालिकेने सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या प्रतिनिधींनी केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला अध्यक्षा ॲड. विद्याताई शिंदे, युवा अध्यक्ष विजय लोंढे, महासचिव दिलीप घुले, सुनील ठाकरे, बापू अशोक बनकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
