रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फराळ व मिठाईचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वांच्या घरात दिवाळी आनंद व उत्साहाने साजरी होत असताना, आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची दिवाळी गोड करण्यात आली. रविवारी (दि.12 नोव्हेंबर) आम आदमीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील जिल्हा रुग्णालयात जावून आजारी रुग्ण, प्रसुती झालेल्या महिला व त्यांच्या नातेवाईकांना फराळ आणि मिठाईचे वाटप केले.
रुग्णालयात घरापासून लांब असलेल्या सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या सीएमो डॉ. वाघ, दत्तात्रय आंबेकर, आम आदमी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला अध्यक्षा विद्या शिंदे, प्राध्यापक अशोक डोंगरे, उपाध्यक्ष गणेश मारवाडे, उपाध्यक्ष सिताराम खाकाळ, युवा आघाडी अध्यक्ष अनिल साळवे, शेतकरी आघाडी अध्यक्ष काकासाहेब खेसे, पूर्वसैनिक आघाडीचे सोमनाथ काळे, कला सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष प्रकाश वडवणीकर, विजय लोंढे, मेजर शिवाजी वेताळ, व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र सामाल आदी उपस्थित होते.

शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ म्हणाले की, सर्वांच्या दारात दिवाळी उत्साहाने साजरी होत असते. मात्र रुग्णालयात असलेल्या सर्वसामान्य वर्ग दिवाळी सणापासून वंचित राहतात. त्यांची दिवाळी साजरी होण्यासाठी आम आदमी पार्टीने पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला. दिवाळी सण हा आनंद साजरा करण्यापेक्षा इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा सण असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळी सणाच्या सकाळी रुग्णालयात ही गोड भेट मिळाल्याने अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईकही भारावले.
