• Wed. Oct 29th, 2025

फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटाकडून महिलेला धक्काबुक्की करून शिवीगाळ

ByMirror

Sep 16, 2024

महिलेची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

हप्ते भरुन देखील वसुली एजंटनी पैश्‍याची मागणी केल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- खासगी फायनान्स कंपनीकडून कर्जापोटी रकमेतून घेतलेल्या चार चाकी लोडिंग वाहनाचे हप्ते भरुन देखील शहरातील गुंड प्रवृत्तीच्या फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटाकडून वीस हजार रुपयांच्या मागणीसाठी धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार जया अजिनाथ पालवे या महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


सदर जया पालवे या नेवासा येथील रहिवासी असून, त्यांनी टाटा कंपनीचे चार चाकी लोडिंग वाहन घेतले आहे. टाटा मोटर्स फायनान्सद्वारे वाहनासाठी कर्ज घेतले असून, कर्जाचा मासिक हप्ता 17 हजार एवढा वेळोवेळी भरला जात आहे. त्यांचे वाहन 10 सप्टेंबर रोजी शेवगाव येथून कांद्याचे भाडे घेऊन शहरातील भिस्तबाग, श्रमिकनगर येथे आले होते. येथील भाजी मार्केटमध्ये कांदा विकत असताना काही अनोळखी व्यक्तींनी विना नंबरच्या मोटरसायकलवर येऊन गाडीचे हप्ते थकलेले असल्याचे सांगू लागले. त्यांना आत्ताच फायनान्स कंपनीला 17 हजार रुपयाचा हप्ता भरलेला असल्याचे पावती दाखवून देखील त्यांनी काही ऐकून न घेता धक्काबुक्की करुन अश्‍लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप पालवे यांनी केला आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये कांदा विकणारे शेतकरी व चालकासह संबंधीतांच्या विरोधात तक्रार देण्यास गेले असता, तक्रार नोंदवून न घेता उडवाउडवीची उत्तरे देऊन घरी जाण्यास सांगण्यात आले. कर्जाने घेतलेले वाहन भाडेपोटी देऊन त्या पैश्‍यातून वाहनाचा हप्ता भरुन कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जात आहे. कुटुंबाला कोणाचाही आधार नसून, अल्पवयीन मुलगा व मुलीची जबाबदारी अंगावर असल्याचे तक्रारदार महिलेने निवेदनात म्हंटले आहे.
या प्रकरणी हप्ते भरलेले असताना देखील फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटानी दिलेल्या त्रासाबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जया पालवे यांनी केली आहे. अन्यथा 23 सप्टेंबर पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *