कोठी परिसरात युवकाला अडवून मारहाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलीसात तक्रार दिल्याचा राग येऊन एका महिलेसह तीन युवकांनी शहरातील कोठी परिसरात मंगळवारी (दि.14 मे) रात्री नदीम अब्दुल हमीद शेख (रा. लालटाकी) याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर एका आरोपीने शेख यांच्या डोक्यावर टणक वस्तूने मारहाण केल्याने ते जखमी झाले.
नदिम शेख यांच्या फिर्यादीवरुन बुशरानिदा अनिस खान, समीर मुनीर शेख (दोन्ही रा. मुकुंदनगर) व दोन अज्ञात युवकांवर कोतवाली पोलीस स्टेशनला मंगळवारी (दि.14 मे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शेख याची बुशरा खान यांच्याशी 10 वर्षापासून ओळख असून त्यांच्यात चार महिन्यांपूर्वी वाद झाला असून, त्याने दोन्ही आरोपी विरोधात यापूर्वी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. शेख हा सोमवारी रात्री 1 वाजल्याच्या सुमारास भावाला आणण्यासाठी पुणे बस स्थानक येथे जात असताना पाटील हॉस्पीटल जवळील पेट्रोलपंप परिसरात आरोपी उभे होते.
खान या महिलेने हाक दिल्यावर शेख थांबला असता, तू आमच्या विरोधात पोलीसात तक्रार का केल्याचे सांगून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करु नकोस म्हंटल्यावर समीर शेख व इतर दोन अज्ञात युवकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्या दरम्यान समीर याने काही तरी टणक वस्तू डोक्यात मारल्याने शेख यांना दुखापत झाली. आरडाओरडा केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर मित्र व नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.