हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात निरोगी स्त्री निरोगी कुटुंब विषयावर व्याख्यान
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त होणारे तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनात महिला व ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिर, संक्रांतनिमित्त हळदी-कुंकू, स्वच्छतेवर जनजागृती व नटसम्राट नाटकाचे सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती काव्य संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे तथा युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे यांनी दिली आहे.
नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 14 जानेवारी रोजी निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात नवोदित कवी व नामवंत कवींचे काव्य संमेलन होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत युवक कल्याण योजनेच्या विशेष घटक अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्त्री रोग तज्ञ डॉ. सुलभा अमित पवार महिलांच्या आरोग्यावर निरोगी स्त्री निरोगी कुटुंब या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तसेच यावेळी ग्रामस्थांसह महिलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. संक्रांतनिमित्त हळदी-कुंकूचा कार्यक्रम रंगणार असून, महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सोलापूर येथील कलाकार फुलचंद नागटिळक गाडगेबाबा यांच्या वेशभुषेत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगणार आहेत. तर वि.वा. शिरवाडकर लिखीत नटसम्राट एकपात्री नाटकचे सादरीकरण करणार आहे. त्यांनी महाराष्ट्रात या नाटकाचे सहा हजारपेक्षा अधिक एकपात्री नाटकाचे प्रयोग केले आहे. काव्य संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रियंका डोंगरे-ठाणगे, प्रतिभा डोंगरे, दादा डोंगरे, दिनकर आंबेडकर, सुरेखा जाधव, कांता वाबळे परिश्रम घेत आहे.