स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त निबंध, वक्तृत्व व पोस्टर स्पर्धेचे आयोजन
विविध क्षेत्रात निस्वार्थपणे सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा होणार गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 जानेवारी रोजी काव्य संमेलन रंगणार असून, या संमेलनात सामाजिक व पर्यावरणाच्या प्रश्नांचा जागर केला जाणार आहे.
तसेच युवा सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी निबंध स्पर्धा, व्यसनमुक्तीवर वक्तृत्व व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर विविध क्षेत्रात निस्वार्थपणे सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींना स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार, स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार व राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे यांनी दिली आहे.
संस्कारक्षम युवक घडविण्यासह पर्यावरण संवर्धनाच्या जनजागृतीसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर काव्य संमेलनमध्ये राज्यासह जिल्ह्यातील नामवंत कवी व नवोदित कवी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ज्येष्ठ व्यक्तींची आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर होणार आहे.
स्पर्धा लहान गट (इयत्ता 5 वी ते 7 वी), मोठा गट (इयत्ता 8 वी ते 10 वी) व खुला गट (महाविद्यालयीन विद्यार्थी) या तीन गटात होणार आहे. निबंध व वक्तृत्व स्पर्धेसाठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज, युवकांचे आदर्श स्वामी विवेकानंद, महाविद्यालयीन गटासाठी स्वामी विवेकानंदाची धर्मनिष्ठा व राष्ट्र प्रेम, आदर्शमाता राजमाता जिजाऊ व आजची महिला हे विषय देण्यात आले आहेत. तर व्यसनमुक्तीवर पोस्टर स्पर्धा होणार आहे.
सदर विषयावर दोनशे ते अडीचशे शब्दात निबंध व व्यसनमुक्तीवर पोस्टर तसेच पुरस्काराचे प्रस्ताव 20 डिसेंबर पर्यंत पै. नाना डोंगरे, अध्यक्ष (संस्थेचे कार्यालय) स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, निमगाव वाघा ता. जि. अहमदनगर 414005 या पत्त्यावर पाठवावे व अधिक माहितीसाठी 9226735346, 8605775261 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. युवा सप्ताह यशस्वी करण्यासाठी युवा मंडळाच्या सचिव प्रतिभा डोंगरे, सचिन जाधव, गौतम फलके, अक्षय ठाणगे, ऋषीकेश बोडखे, छाया वाबळे, कांता वाबळे, किरण ठाणगे, देविदास आंबेकर, प्रियंका डोंगरे-ठाणगे परिश्रम घेत आहे. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.