• Sat. Nov 22nd, 2025

एक प्राध्यापक, प्राचार्य ते कुलगुरू पर्यंतचा यशस्वी प्रवास

ByMirror

Nov 13, 2025

डॉ. सर्जेराव निमसे यांचा थक्क करणारा 44 वर्षांचा प्रवास

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात, महाराष्ट्रात व देशामध्ये शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणारे नगर तालुक्याचे भूषण असणारे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे सर यांचा जीवनपट जर पाहिला तर तो खरोखर आजच्या समाजाला आदर्श घेण्यासारखा नक्की आहे. सामान्य शेतकरी कुटुंब जन्मलेले निमसे सरांनी अनेकविध क्षेत्रांमध्ये, विविध पदावर कार्य करताना ,आपल्या कार्यकर्तृत्वाची चुणूक दाखवून दिली, त्यांचे कार्य मोलाचे आहे. सरांचं कार्य विचार ,शिक्षण क्षेत्रासाठी सदैव प्रेरणादायी असेच आहे.


डॉ. निमसे सरांनी गणित विषयासारख्या क्लिष्ट विषयांमध्ये विद्यानिष्णात होऊन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेच्या न्यू आर्ट्‌स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयामध्ये अध्यापन कार्य सुरू केलं. प्रभावीपणे गणित विषयाचा अध्यापन कार्य करताना, संस्थेने त्यांच्या कामाची, कार्य करण्याची पद्धत व त्यांचे कार्यकर्तृत्व जवळून पाहिलं आणि म्हणूनच पुढील काळामध्ये त्यांना महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली, आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करत महाविद्यालयाचा कायापालट केला. महाविद्यालयामध्ये अनेकविध अभ्यासक्रम त्यांनी सुरू केले. त्याच काळामध्ये ते पुणे विद्यापीठांमध्ये अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, त्याचबरोबर विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता म्हणून कार्य करू लागले. या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना महाविद्यालय सुद्धा ते अतिशय प्रभावीपणे सांभाळ आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या विविध शाखांमध्ये नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले. त्यांच्या कार्यकाळातच त्यांनी संज्ञापन विभाग, ॲनिमेशन विभाग, पदव्युत्तर गणित विभाग तसेच अनेक कोर्सेस सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार मोठी संधी निर्माण करून दिली.


नागराज मंजुळे , भाऊ कऱ्हाडे व आदी सारखे सिने दिग्दर्शक, निर्माता, पत्रकार न्यू आर्ट्‌स महाविद्यालयामध्ये निर्माण झाले. याचे सर्व श्रेय सरांच्या दूरदृष्टीला जाते. त्यांनी आपल्या काळामध्ये विज्ञान शाखेमध्ये अनेक सुसज्ज अशा प्रयोगशाळांची उभारणी केली. विद्यार्थिनींसाठी भव्य अशा वस्तीगृहाची मंजुरी घेऊन त्याची उभारणी केली. पदवी आणि पदव्युत्तर अनेक अभ्यासक्रम त्यांनी महाविद्यालयात सुरू केले. त्यामुळे महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनामध्ये त्याचा खूप चांगला फायदा झाला आहे. संस्थेच्या कार्यकारणीत सुद्धा निमंत्रित तज्ञ मार्गदर्शक प्राचार्य म्हणून त्यांनी अतिशय प्रभावीपणे कार्य केले. एकंदरीतच संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये सरांनी खूप मोलाची भर टाकली. अतिशय प्रभावीपणे कार्य केले आणि त्यांच्या कार्याचा सदैव संस्थेला अभिमान आहे. सरांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक परिषदांचे महाविद्यालयामध्ये आयोजन करून ग्रामीण भागातील मुलांसाठी फार मोठी संधी निर्माण करून दिली. एकावेळी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. पुढे सरांचं कार्य वाढत जाऊन नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांच्या या कार्याची नोंद घेत उत्तर प्रदेश येथील लखनौ विद्यापीठात कुलगुरू म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. तसेच इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष पद भूषविले.सरांचां एक गणित अभ्यासक, संशोधक ते कुलगुरू हा त्यांचा 44 वर्षांचा प्रवास थक्क करणारा आहे.

एकंदरीत निमसे सरांच्या या जीवन कार्याचे सिंहालोकन करताना आपण जर पाहिलं तर सरांचा कारभार हा एक स्वच्छ, निर्मळ व पारदर्शक असा होता. स्पष्टक्तेपणा आपल्या सहकाऱ्यांवर नियंत्रण, व उत्तम प्रशासक म्हणून सरांचा गौरव करावा लागेल. असे विशाल दृष्टिकोन असलेले कुलगुरू एक खंबीर नेतृत्व आहे.


भावभावनांची प्रगल्भता अंगीकृत केलेले व्यक्तिमत्व. समर्पित भावनेने कर्तव्य करणारे निमसे सर. स्वतःला विकास कामात झोकून देतात. त्यांचे विधायक नी पवित्र काम सदैव दीपस्तंभा प्रमाणे आहे. त्यांचं कार्य समाज धुरिणांना मार्गदर्शक ठरेल असे आहे. निमसे सर हे सदैव वटवृक्षा प्रमाणे सावलीसारखे भक्कम व कृपाळू दृष्टी ठेवून सर्वांच्या पाठीशी उभे राहिले आहेत, त्यांच्या प्रत्येक शब्दात मायेचा श्‍वास आहे. नवनवीन निर्माण करण्याची क्षमता आहे, ती सदैव राहो अशा विशाल दृष्टिकोन असलेल्या कुलगुरूंच्या अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होतोय. व निमित्ताने त्यांच्या प्रा. गणेश भगत या शिष्याने संपादित केलेला कुलगुरू हा गौरव ग्रंथ प्रकाशित होतोय. डॉ. सर्जेराव निमसे सरांनी गरिबीची कवच कुंडली घेऊन जन्माला आले, पण आपल्या अविरत परिश्रमानी त्यांनी कवच कुंडले सहजगत्या उतरवली, ती उतरवली, पण श्रीमंतीची लेणी कधीच अंगावर बाळगली नाही.


अशीही असामान्य व विशाल दृष्टिकोन असलेली व्यक्ती, आमच्या संस्थेला लाभली हे भाग्य म्हणावे लागेल. आमच्या संस्थेतील एक प्राध्यापक, प्राचार्य ते कुलगुरू पर्यंतचा यशस्वी प्रवास. ही संस्थेसाठी एक अभिमानाची बाब आहे. निमसे सर एक ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ संशोधक, लेखक आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या या अमृत महोत्सवानिमित्त अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण या संस्थेच्या वतीने व आमच्या मुळे प्रतिष्ठांच्या वतीने व परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य आयुष्य लाभो. व उत्तरोत्तर आणखी चांगले कार्य घडो ही सदिच्छा
-मुकेश माधवराव मुळे (सहसचिव- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहिल्यानगर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *