उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्रीकडे तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर येथील नगर-मनमाड महामार्गावर रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना मागे सरकवून बसविण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा व मार्केट मधील शेतकरी व इतर विक्रेत्यांना विविध सोयी-सुविधा देण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून देणगी जमा केल्यास खंडणीसारखे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या पोलीस निरीक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची तक्रार भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अंतोन गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नवनागापूर सह्याद्री चौकात नगर-मनमाड महामार्गावर नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने पंधरा वर्षापासून मार्केट चालवले जातआहे. परंतु या ठिकाणी स्वच्छता नसल्याने येथील ग्राहक व विक्रेत्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी वॉचमन नसल्याने काही व्यापारी, शेतकरी रस्त्यालगत बसत आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी होऊन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे परिसरात लहान-मोठे अपघात होत आहे. या मार्केटमध्ये लाईट नसल्याने संध्याकाळी ग्राहकांची व विक्रेत्यांची तारांबळ उडते. तर अंधाराचा फायदा घेवून चोऱ्याचे प्रमाण देखील वाढले आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अशा अनेक सोयी-सुविधा नसल्याने व्यापारी शेतकरी ग्राहकांची गैरसोय होत आहे. या सुविधा असोसिएशनच्या माध्यमातून पुरवून त्यांच्याकडून रितसर देणगी पावतीद्वारे पैसे जमा करण्यास एमआयडीसी पोलीसांचा विरोध आहे. देणगी जमा केल्यास पोलीस निरीक्षकांनी खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असल्याचे गायकवाड यांनी निवेदनात म्हंटले आहे.
भाजी विक्रेत्यांना मागे सरकवून बसविण्यासाठी योग्य शुल्क भरुन पोलीस बंदोबस्त मिळावा व खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या त्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
