• Wed. Jul 30th, 2025

वंचित बहुजनचे उमेदवार हनीफ शेख यांच्या प्रचारार्थ शहरात मोटारसायकल रॅली

ByMirror

Nov 18, 2024

जनसामान्यांच्या प्रश्‍नांना बगल देऊन वाटण्याची व कापण्याच्या भाषेमुळे समाजात द्वेष -उत्कर्षाताई रूपवते

नगर (प्रतिनिधी)- शहर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ जैनुद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ शहरासह उपनगर भागातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते प्रमुख उपस्थितीमध्ये निघालेल्या मोटारसायकल रॅलीत उमेदवार हनीफ शेख, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड, जिल्हा सल्लागार जे.डी. शिरसाठ, नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, प्रवीण ओरे, देविदास भालेराव, प्रतीक जाधव, अजय परदेशी, आशिष क्षेत्रे, शुभम जगदाळे, उमेश जाधव, विनोद गायकवाड, सुधीर ठोंबे, डॉ.सिताताई भिंगारदिवे, गौरव साळवे, प्रकाश साळवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


उत्कर्षाताई रूपवते म्हणाल्या की, जनसामान्यांच्या प्रश्‍नांना बगल देऊन समाजाला वाटण्याची व कापण्याच्या भाषेमुळे समाजात द्वेष पसरविण्याचे काम करत आहे. युवकांचा रोजगार. महिलांची व अल्पसंख्यांक समाजाच्या सुरक्षिततेवर बोलले जात नाही. वंचित बहुजन आघाडी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे काम करत आहे. जातीयवाद व धर्मांधशक्तीमुळे देशाची प्रगती खुंटली जाणार आहे. लोकशाही मार्गाने सर्वांना बरोबर घेऊन काम करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना निवडून देण्याची गरज आहे. घराणेशाही व दबावतंत्राचा वापर करणाऱ्या उमेदवारांना धडा शिकविण्याचे त्यांनी आवाहन केले.


उमेदवार हनीफ शेख म्हणाले की, शहरात सर्वसामान्य नागरिकांना भितीच्या सावटाखाली वावरावे लागत आहे. नेते मंडळी गुंडगिरीची भाषा वापरत असून, शहराचा विकास खुंटला आहे. अल्पसंख्यांक समाजाचा फक्त मतांसाठी वापर करण्यात आला. मात्र त्यांच्या प्रश्‍नांकडे डोळेझाक करुन त्यांच्यावर दडपशाही सुरु असून, सर्वसामान्यांनी पर्याय म्हणून निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.


योगेश साठे यांनी शहरात उभा राहत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे श्रेय सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे आहे. या पुतळ्यासाठी 25 वर्ष संघर्ष करावा लागला. कोणत्याही नेत्याने या पुतळ्याचे श्रेय घेऊ नये, असा इशारा दिला.


भिंगार परिसरातून मोटारसायकल रॅलीचे प्रारंभ झाले. मुकुंदनगर, कोठला, रामचंद्र खुंट, हातमपुरा, मार्केटयार्ड, जुने बस स्थानक, माळीवाडा, पंचपीरचावडी, जुनी महापालिका, दिल्लीगेटमार्गे सिद्धार्थनगर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या मार्गातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात आले. तसेच निलक्रांती चौक येथील वंचित बहुजन आघाडीचे दिवंगत नेते भाऊ साळवे यांच्या घरी जाऊन पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *