पयामे इन्सानियत अभियानास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धर्म वेगळे असले तरी, सर्वांची शिकवण माणुसकी -मौलाना अबू तालीब रहमानी
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात वाढत चाललेला जातीय द्वेष, धर्मा-धर्मातील वाद व निर्माण होणारी अशांतता रोखण्यासाठी शहरात पयामे इन्सानियत अभियान उपक्रमातंर्गत मानवतेचा संदेश उपक्रम राबविण्यात आला. मुस्लिम समाजातील मौलाना, सर्व धर्मिय प्रतिनिधी व पोलीस अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या सोहळ्यातून धार्मिक एकात्मतेसाठी मानवतेचा संदेश देण्यात आला.

नगर-औरंगाबाद महामार्गावरील कवीजंग लॉनमध्ये मौलाना अबू तालीब रहमानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी हाजी शौकत तांबोळी, मौलाना रियाज, विभागीय पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, हाजी अब्दुस सलाम, अल्ताफभाई, डॉ. रफिक सय्यद, काँग्रेसचे किरण काळे, राष्ट्रवादी व्यापार उद्योग विभागाचे अनंत गारदे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी किसनराव लोटके, खलील सय्यद, वहाब सय्यद आदींसह शहरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मौलाना अबू तालीब रहमानी म्हणाले की, आपला भारत देश विविधतेने नटलेला असून, सर्व धर्मिय गुण्यागोविंदाने राहत आहे. धर्म वेगळे असले तरी, सर्वांची शिकवण माणुसकी आहे. मात्र राजकारणाच्या फायद्यासाठी धर्मा-धर्मात भांडण लावून माणुसकी संपविण्याचे कार्य सुरु आहे. जातीय द्वेषाने माणुसकीचा बळी जात आहे. जगात हिम नद्या वितळत आहे, पर्यावरणाचे प्रश्न गंभीर बनले असून, अनेक पशु-प्राणी मरत आहे, जंगल तोड सुरु आहे. संपूर्ण मानवजात संकटात असताना, धर्म संकटात असल्याचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
हाजी शौकत तांबोली म्हणाले की, भारतात सर्वाधिक युवा शक्ती असून, या युवकांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. युवकांची माथी भडकवून, त्यांना रोजागार देण्याऐवजी हातात लाठी-काठी दिल्यास देशाचे मोठे नुकसान होणार आहे. धर्मांधतेने पिढी बर्बाद होत आहे. युवकांना रोजगार व उच्च शिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे म्हणाले की, कोरोना काळात माणुसकी धर्म पहायला मिळाला. सर्व माणुसकीच्या भावनेने एकमेकांच्या मदतीला धावले. मात्र काही समाजातील एकोपा व शांतता भंग करण्यासाठी जातीय द्वेष पसरविला जात आहे. सोशल मीडियाच्या आहारी जावून युवा वर्गाची विचार क्षमता संपत चालली आहे. सोशल मीडियात जसे चित्र रंगवले जाते ते अभासी जीवन युवक खरे समजू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या उपक्रमांतर्गत महिला, विद्यार्थी व युवकांना देखील विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
