ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ॲड. राजेश कातोरे पाटील
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त होणाऱ्या तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ॲड. राजेश कातोरे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन होत आहे.
5 सप्टेंबरला निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात येणार आहे. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंतांचे परिसंवाद व व्याख्याने होणार असून, मध्य सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील साहित्य व काव्यप्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ॲड. राजेश कातोरे पाटील हे वकील संघाचे अध्यक्ष असून, ते माजी नगरसेवक देखील आहेत. त्यांना साहित्याची विशेष आवड आहे. सामाजिक व साहित्यिक चळवळीत त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊनच त्यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.
ॲड. कातोरे यांच्या निवडीबद्दल विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, संमेलनाध्यक्ष राजेंद्र फंड, प्राचार्या गुंफाताई कोकाटे, तसेच ॲड. महेश शिंदे, ॲड. ऐश्वर्या काळे, ॲड. विजय केदार, ॲड. संतोष गायकवाड आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
