• Wed. Feb 5th, 2025

अ फर्स्ट स्टेप प्री-प्रायमरी स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Jan 23, 2025

कश्‍मीर ते कन्याकुमारीचे घडविले दर्शन

सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांसह मातांचा देखील सहभाग

नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील अ फर्स्ट स्टेप प्री-प्रायमरी स्कूलच्या स्नेहसंमेलनात बालकलाकारांनी आपल्या अदाकारीने व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. शाळेचे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन केडगाव देवी रोड येथील ऊर्जा रंगभवन येथे उत्साहात पार पडले.


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व गणेश वंदनेने करण्यात आली. स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सचिन आहेर, महावितरण शहर उपविभाग दोनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भाऊसाहेब कुमावत उपस्थित होते.
डॉ. सचिन आहेर यांनी मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात पालकांना मार्गदर्शन केले. शाळेच्या संचालिका मोनिका रविंद्र कुसळकर यांनी मुलांसाठी खेळातून शिक्षणासोबतच डिजिटल शिक्षणाची सांगड घालून मुलांच्या शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.


अतिरिक्त कार्यकारी अभियंता कुमावत यांनी मुलांसाठी पालकांनी वेळ द्यायला हवा. त्यांना सोशल मीडियापासून लांब ठेवून त्यांचा मानसिक, बौध्दिक व शारीरिक विकास साधण्यासाठी त्यांच्यात वाचन, मैदानी खेळाची आवड निर्माण करण्याचे त्यांनी आवाहन केले.


कार्यक्रमासाठी सुलक्षणा आडोळे, रुपाली टाकते आणि वैजंता कातोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी वर्गशिक्षिका दिपाली बनकर, अर्चना केदार, उर्मिला ठाकूर यांनी परिश्रम घेतले.
स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात मुलांनी विविध गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. सांस्कृतिक आणि आधुनिक जगाचे मेळ घालून विठ्ठल भक्ती, राधा कृष्णाचे प्रेम तर लक्ष्मीकांत बर्डे आणि अशोक सराफ यांच्या गाण्यावर ताल धरला होता. तर बॉलीवूडच्या धमाकेदार गीतांनी कार्यक्रमात रंग भरला. सोशल मीडियाचे दुष्परिणाम दर्शवणारी विद्यार्थांनी नाटिका सादर केले. तसेच आपल्या भाषणातून चिमुकल्यांनी वक्तृत्वाचे कौशल्य देखील दाखवले.


मोनिका कुसळकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या मातांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी घागरा घालून आठ गाण्यांच्या फ्युजनवर महिलांनी नृत्याचे सादरीकरण केले. आपल्या चिमुकल्यांचे कलागुण पाहण्यासाठी आई-बाबांबरोबर आजी-आजोबा देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बालकांच्या या कलागुणांना त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रमाची सांगता मुलांनी भारत देशातील कश्‍मीर ते कन्याकुमारी अशा विविध प्रदेशातील लोकांच्या वेशभूषा परिधान करुन विविध भाषेतील गाण्यांच्या कडव्यांवर ठेका धरत रॅम्प वॉक केला. कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *