अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर जागरण गोंधळ
शिल्लक व मयत लाभार्थीच्या धान्याचे रजिस्टर गहाळ केल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिल्लक धान्य व मयत लाभार्थी धान्याचे रजिस्टर गहाळ करून त्या धान्याचा अपहार केल्याप्रकरणी पारनेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारावर पुरवठा विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने नाशिक विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर जागरण गोंधळ करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुका अध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यातील मौजे खडकवाडी, मांडवे खुर्द, पळशी येथील शिल्लक धान्य व मयत लाभार्थींच्या धान्याचे रजिस्टर उपलब्ध नाही. बाकी सर्व दप्तर उपलब्ध आहे. फक्त मयत लाभार्थी व शिल्लक धान्य याचे दप्तर गहाळ करण्यात आले आहे. स्वस्त ध्यान दुकानदाराने संगणमत करून धान्याची परस्पर बाजारमध्ये विक्री करुन मोठ्या प्रमाणात अपहार केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
गोरगरिबांचे धान्य लुटून शासनाची एकप्रकारे फसवणूक करण्यात आलेली आहे. स्वस्त धान्य दुकानाची दप्तर तपासणी विभागीय स्तरावर करून धान्याचा अपहार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
