मयत मुलाच्या आईची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे योग्य चौकशीची मागणी
हॉटेलचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन संशयितांची सखोल तपास व्हावी
नगर (प्रतिनिधी)- देवीभोयरे फाटा (ता. पारनेर) येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या वादातून मुलगा गिरजू चिकणे (वय वर्षे 25) याचा घातपाताने हत्या करण्यात आली असल्याचा दावा मयत मुलाची आई गीता रोहिदास चिकणे यांनी केला आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणी हॉटेलचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन संशयतांची सखोल तपास करुन न्याय मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे. मारहाण झाल्यानंतर मयत मुलाचे कपडे व कंबरचा पट्टा चिंचोलीच्या घाटात सापडला असताना देखील तपास अधिकारी यासंबंधी दखल घेत नसल्याचा आरोप मयताच्या आईने केला आहे.
याप्रकरणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व सामाजिक कार्यकर्ते राजू पवार यांनी मयत झालेल्या मुलाच्या आईला न्याय मिळण्यासाठी या प्रकरणाचा तपास होण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी चिकणे कुटुंबीय उपस्थित होते.
गिरजू चिकणे (रा. बाभूळवाडा) हा मयत युवक शेती काम करुन कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत आहे. 16 जुलै 2024 रोजी संध्याकाळी देवीभोयरे फाटा येथील हॉटेल सचिनमध्ये जेवण करत असताना त्याचे काही लोकांबरोबर शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर चार ते पाच लोकांनी त्याला गंभीर मारहाण करून कोठे तरी अज्ञात ठिकाणी नेऊन त्याची हत्या केल्याचा आरोप मयताच्या आईने केला आहे.
मयत मुलाच्या शोधासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेथे कोणीच काही माहिती देत नव्हते, दुसऱ्या दिवशी शोध न लागल्याने पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. एका व्यक्तीने फोन करुन तुमच्या मुलाचे भांडण झाल्याचे सांगितले. पुन्हा दुसऱ्या एका व्यक्तीने ज्या व्यक्तीबरोबर भांडण झाले त्याची माहिती दिली. हॉटेल मालकाकडे त्या दिवशीचे सीसीटिव्ही फुटेज मागितल्यास तो सदर सीसीटिव्ही बंद असल्याचे सांगत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
मुलाच्या मारहाणीची माहिती देणाऱ्या व्यक्तींची विचारपूस करुन सत्य माहिती समोर आणावी, चिंचोलीच्या घाटात मुलाचे कपडे व कंबरेचा पट्टा सापडला असताना त्याचा योग्य तपास व्हावा, मारहाणीची घटना घडलेल्या हॉटेलचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घ्यावे, संशीयांना ताब्यात घेऊन चौकशी करावी व त्यांचे मोबाईल रेकॉर्डिंग आणि लोकेशन देखील तपासण्याची मागणी चिकणे कुटुंबीयांनी केली आहे.