2 डिसेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
नगर (प्रतिनिधी)- दोन वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या दीपक उंडे या युवकाचा शोध घेण्यास पारनेर पोलीस अपयशी ठरले असताना, पोलीसांनी घेतलेल्या वेळकाढूपणाच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. तर या प्रकरणाचा तपास नगरच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करुन 2 डिसेंबर 2024 पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
पारनेर तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या दीपक उंडे (रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर) या युवकाचा अद्यापि शोध लागलेला नाही. त्याचे वडिल सुदाम उंडे यांनी मुलाचा अपहरण करुन घातपात करण्याता आल्याचा संशय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी पारनेरच्या पोलीसांकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांची कोणतीच दखल घेण्यात आली नाही.
पारनेर पोलीसांकडून न्याय मिळत नसल्याने हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली. त्यावर निकाल देताना सदर गुन्हा गुन्हे शाखेच्या निरीक्षकाकडे सोपविण्याचे आदेश नगरच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. तर तपास अहवाल 2 डिसेंबर 2024 रोजी न्यायालया समोर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.