140 रुग्णांची मोफत तपासणी
व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटलने नवजीवन दिले -पेमराज बोथरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटल नवजीवन देण्याचे काम करीत आहे. प.पू. आनंदऋषीजी महाराजांच्या विचाराने सेवाभाव हे ध्येय समोर ठेऊन आदर्शऋषीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. दर महिन्याला दोन आरोग्य शिबिर घेऊन सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य सुरु असल्याचे प्रतिपादन उद्योजक पेमराज बोथरा यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व. जतनबाई माणकचंदजी बोथरा यांच्या स्मरणार्थ पारस ग्रुपच्या वतीने मोफत मूत्रविकार तपासणी आणि उपचार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी पेमराज बोथरा बोलत होते. यावेळी संतोष बोथरा, सतीश बोथरा, प्रतिभा बोथरा, समिक्षा बोथरा, गौरव बोथरा, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे डॉ. मयुर मुथा, मूत्रविकार तज्ञ डॉ. संकेत काळपांडे, डॉ. गोविंद कासट, डॉ. भास्कर जाधव, बाबूशेठ लोढा, डॉ. आशिष भंडारी आदी उपस्थित होते.
पुढे पेमराज बोथरा म्हणाले की, मोठ्या विश्वासाने मानवसेवेच्या मंदिरात रुग्ण येत आहे. रुग्णसेवेच्या महायज्ञात बोथरा परिवार योगदान देत असून, समाज सेवेसाठी नेहमीच कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात डॉ. आशिष भंडारी म्हणाले की, राज्यातील एक अद्यावत हॉस्पिटल म्हणून आनंदऋषीजी हॉस्पिटलने नावलौकिक मिळवला आहे. हॉस्पिटल पर्यंत पोहचू न शकणारे बीड व अहमदनगर जिल्ह्यातील दुर्बल घटकांना वाडी-वस्तीवर जाऊन हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा पुरवली जात आहे. हॉस्पिटलच्या स्थापनेपासून बोथरा परिवार तन, मन, धनाने योगदान देत आहे. आरोग्य सेवेचा सर्वोत्तम दर्जा व अल्पदरात गरजूंची सेवा या भूमिकेतून हॉस्पिटलची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. मयुर मुथा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलचे मोफत शिबिर सर्वसामान्य घटकांना आधार देत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत विविध शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये मोफत होत असल्या तरी, इतर खर्चिक औषधोपचार अल्पदरात उपलब्ध असल्याने गरजूंना त्याचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
मूत्रविकार तज्ञ डॉ. संकेत काळपांडे यांनी मूत्रविकाराच्या विविध आजार व त्यावर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेली अद्यावत उपचार पद्धतीची माहिती दिली. आभार सतीश लोढा यांनी मानले. या शिबिरात 140 रुग्णांची मूत्रविकार तपासणी करण्यात आली. तर एन्डो युरोलॉजिकल (मूत्र पिंड, मूत्रमार्ग, मूत्राशय) स्टोन शस्त्रक्रिया प्रोस्टेट रोग उपचार युरेथ्रल स्ट्रीचर रोग व्यवस्थापन, पुरुष वंध्यत्व समुपदेशन मुल्यमापन आणि व्यवस्थापन, महिलांचे मूत्रमूल्यमापन आणि व्यवस्थापन, महिलांचे मूत्रमार्गातील विकार मूत्रमार्ग, मूत्राशय, प्रोस्टेट पुरुषांचे जनेंद्रिय अंडाशय कर्करोग व्यवस्थापनावर मार्गदर्शन करुन तपासण्या करण्यात आल्या. तर यासंबंधी महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.