जागा बळकाविण्याच्या उद्देशाने जीवे मारण्याची धमकी देऊन बांधकाम करणार्यांवर कारवाईची मागणी
महिलेची पोलीस अधीक्षकांकडे धाव
अहमदनगर (प्रतिनिधी)- जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाच्या मनाई हुकूमाला न जुमानता बांधकाम करणारे व त्यांना विचारणा केल्यास जीवे मारण्याची धमकी देणार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन ढवळपुरी (ता. पारनेर) येथील रिजवाना शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. यावेळी याकुब शेख, शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद उपस्थित होते.
ढवळपुरी (ता. पारनेर) येथील शेख वस्ती येथे 784 गट नंबर भाऊकीमध्ये जागेचा वाद सुरु आहे. सदर जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना समोरील व्यक्तींनी त्या जागेत सिमेंटचे पोल उभारले आहे. न्यायालयाचा मनाई हुकूम असताना काम करू नका, असे सांगितल्याचा राग तय्यब सुभेदार शेख, वसिम सुभेदार शेख व त्यांच्या कुटुंबीयांनी जीवे मारण्याचे सांगून धमकाविले. तर हातात कुर्हाड, दांडके घेऊन अंगावर धावून आले. तेथून पळ काढून जीव वाचविण्यात आला. पती याकुब शेख हे सरकारी कर्मचारी असल्याने त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची संबंधित व्यक्ती धमक्या देत असून, सदरील व्यक्ती गुंड प्रवृत्तीच्या असून त्यांच्यापासून कुटुंबीयांना जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जागा बळकाविण्याच्या उद्देशाने न्यायालयाच्या मनाई हुकूमाला न जुमानता बांधकाम करणारे व त्यांना विचारणा केल्यास जीवे मारण्याची धमकी देणार्यांवर कारवाई करण्याची मागणी शेख यांनी केली आहे.