चांगल्या विचारांच्या लोकांमुळे समाज पुढे जात आहे -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- चांगल्या विचारांच्या लोकांमुळे समाज पुढे जात आहे. राजकारण फक्त निवडणुकांपुरते मर्यादीत ठेऊन सामाजिक कार्याने चांगले माणसे जोडून विकासात्मक योगदान देण्याची गरज आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असावेत, मात्र वैर असता कामा नये. समाजाला दिशा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. जीवन जगताना त्याचा आनंद व शेवटी समाधान देखील असला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केले.
राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलच्या वतीने मर्चंट बँकेच्या संचालकपदी संजय चोपडा तर लॉयर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी हाफिज जहागीरदार निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. विधाते बोलत होते.

याप्रसंगी उद्योग व व्यापार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अनंत गारदे, अशोक कानडे, राजेंद्र गांधी, डिस्ट्रीक्ट जॉईंट रजिस्टार व्ही.पी. शिंदे, नंदनसिंह परदेशी, खलिल सय्यद, रियाज शेख, निजाम जहागीरदार, अशोक गुंजाळ, अरकान जहागीरदार, जयनारायण बलदवा, सचिन गारदे, नितीन गारदे, सुरेश फुलसौंदर, रंगनाथ खेंडके, जानव्ही गारदे, उमेश धोंडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात अनंत गारदे यांनी राजकारण व समाजकारणात काम करताना सर्वच क्षेत्रातील व्यक्तींशी ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. मित्र परिवारातील व्यक्तींनी मिळवलेले यश अभिमानास्पद असून, त्यांचा सत्कार करण्यात आल्याचे सांगितले.

अशोक गुंजाळ म्हणाले की, चांगल्या विचारांची माणसे एकत्र जमत असल्याने त्याला एक संघटनचे रूप देण्याची गरज आहे. पक्षविरहित संघटन उभे करून, सामाजिक कार्य उभे होणार आहे. समविचारी लोकांना एकत्र घेऊन चांगल्या विचाराने शहरात योगदान देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना संजय चोपडा म्हणाले की, मार्गदर्शक व ज्येष्ठ व्यक्तींच्या हातून झालेल्या सत्कार पुढील कार्यास ऊर्जा देणारा आहे. सत्कारांमुळे जबाबदारी वाढून आनखी काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
हाफिजभाई जहागीरदार म्हणाले की, लॉयर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून सर्व वकील बांधव जोडले गेलेले आहेत. राजकारणाच्या उद्देशाने दोन समाजात वैमानस्य निर्माण करण्याचे काम होत आहे. मात्र सर्व वकील बांधवांनी मतभेद न ठेवता लोकशाही व निरपेक्ष पध्दतीने संधी दिल्याचे सांगितले. तर सोसायटीच्या कार्याची माहिती दिली.