आश्वासन देऊन देखील चार महिन्यापासून पेमेंट देण्यास टाळाटाळ
भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या वतीने भजन आंदोलनाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री गजानन महाराज साखर कारखान्याकडून आश्वासन देऊन देखील चार महिन्यापूर्वीचे थकित पेमेंट मिळत नसल्याने पारनेर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या माध्यमातून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची भेट घेऊन थकित पेमेंट व्याजासह मिळण्याची निवेदनाद्वारे मागणी केली. अन्यथा 4 मे रोजी शेतकर्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत भजन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर, धनेश्वर लोंढे, रविंद्र मुगदे, रामा पानमंद, कृष्णा रोहकले, बाबासाहेब लोंढे, मुन्ना मासळकर, रवींद्र मुगदे, बाबासाहेब रोहोकले आदी पारनेर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

यु.टेक (एस.जी.एम.एस.एल.) श्री गजानन महाराज साखर कारखाना कौठे मलकापूर (ता. संगमनेर) यांनी पारनेर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी चार महिन्यापूर्वी ऊस दिला होता. पारनेरचा देवी भोयरे साखर कारखाना चांगल्या स्थितीमध्ये असता, तर ही वेळ शेतकर्यांवर आली नसती. मोठ्या विश्वासाने शेतकर्यांनी कारखान्याला ऊस पाठविला. मात्र कारखान्याचे मालक व व्यवस्थापनाला सातत्याने चार महिन्यापासून संपर्क करूनही उसाचे पेमेंट न देता शेतकर्यांची फसवणूक व चेष्टा केली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
शेतकरी रात्रंदिवस कष्ट करुन ऊस पिकवतात. मात्र कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून वेळेवर पेमेंट दिले जात नसून, न्याय कोणाकडे मागावा अशी दयनीय अवस्था झाली आहे. 31 मार्च दरम्यान शेतकर्यांना पेमेंट मिळाले असते, तर सेवा सोसायटीचे पीक कर्ज भरता आले असते. पेमेंट वेळेवर न मिळाल्याने शेतकर्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 11 टक्के व्याजदर आणि शेतकर्यांना कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. त्याला सर्वस्वी संबंधित कारखान्याचे मालक व व्यवस्थापन जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
2 एप्रिल रोजी पेमेंट न मिळाल्यास शेतकर्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर संचालकांनी 20 एप्रिल पर्यंत पेमेंट देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप पर्यंत पेमेंट देण्यात आलेले नाही. शेतकर्यांना त्वरित त्यांच्या बँक खात्यावर बँक व्याजदरासह पेमेंट जमा करण्याचे आदेश देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याचा इशारा देऊन पेमेंट थकलेल्या ऊस उत्पादक शेतकर्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.