अहमदनगर (प्रतिनिधी)- सदृढ व निरोगी भारताच्या संकल्पनेवर फिटीस्तान एक फिट भारत उपक्रमातंर्गत झालेल्या पुशअप्स मारण्याच्या स्पर्धेत नगरचे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पै. राजकुमार आघाव पाटील यांच्यासह आघाव परिवाराने उल्लेखनीय कामगिरी केली.
नुकतेच पुश इंडिया पुशअप्स ही राष्ट्रीय स्तरावरील पुशअप्स मारण्याची स्पर्धा पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये रंगली होती. यामध्ये देशातील विविध खेळातील आजी-माजी खेळाडू व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सहभाग नोंदवला. राजेंद्र सोमाणी यांनी सदृढ व निरोगी भारत या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
यामध्ये पै. राजकुमार आघाव, मुलगी रुचिता आघाव व मुलगा कृष्णवर्धन आघाव यांनी सहभाग नोंदवून चांगल्या प्रकारे पुशअप्स मारल्याबद्दल त्यांचा माजी जनरल लष्कर प्रमुख व्ही.के. सिंग, प्रशासकीय अधिकारी मेजर पुनिया यांच्या हस्ते मेडल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आघाव परिवाराने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.