गीत ड्राँईग क्लासेस व वर्चस्व ग्रुपचा उपक्रम
आर्ट अॅण्ड क्राफ्टच्या उन्हाळी शिबिराने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणार -सागर मुर्तडकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्ट अॅण्ड क्राफ्टच्या उन्हाळी शिबिराने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणार. मोबाईलमध्ये भावीपिढी अडकत असताना त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थीमध्ये वेगवेगळी क्षमता असून, ती ओळखून त्या दिशेने प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वर्चस्व ग्रुपचे सागर मुर्तडकर यांनी केले.
गीत ड्राँईग क्लासेस व वर्चस्व ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित आर्ट अॅण्ड क्राफ्ट समर कॅम्पच्या उद्घाटनाप्रसंगी मुर्तडकर बोलत होते. यावेळी शारदाताई बोगा, श्रीकांत मंडाल, गीत ड्रॉइंग क्लासच्या गीतांजली रोहित लाहोर, समर कॅम्पचे आयोजक रोहित लाहोर, कविता लाहोर, स्वप्निल लाहोर, वृषाली भूमकर, प्रमिला लोटके, श्याम सोनवणे, रवी दंडी, ललित भूमकर, जय लोटके, संदीप गोंधळे, अमित जिंदम, सागर अंकाराम, नमन गोविंदा आदींसह ग्रीन अॅप्पल अकॅडमीच्या शिक्षिका उपस्थित होत्या.

रोहित लाहोर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी आर्ट अॅण्ड क्राफ्ट समर कॅम्पचा उपक्रम राबविण्यात येत आहे. कलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन या उपक्रमाद्वारे दिले जात असून, यामधून भविष्यातील उत्तम कलाकार घडणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सात दिवसीय समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना चित्रकला, वुड थाळी मेकिंग अॅण्ड पेंटिंग, ग्लास पेंटिंग, थ्रीडी ग्रीटिंग कार्ड, थ्रीडी ओरिगामी वर्क व बॉटल वर्क यामध्ये शिकविण्यात येत आहे. तोफखाना व नगर-कल्याण रोड येथे दोन ठिकाणी स्वतंत्र्य बॅचला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. 21 एप्रिल रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये समर कॅम्प मधील मुलांना सहभागी होता येणार आहे. तर 22 मे रोजी मुलांनी बनवलेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे.