वारुळाचा मारुती मंदिर परिसरातून पारंपारिक वाद्यांसह विजयी मल्लाची मिरवणुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील युवा कुस्तीपटू पै. आकाश अशोक घोडके याने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल वारुळाचा मारुती मंदिर परिसरातून पारंपारिक वाद्यांसह मिरवणुक काढून, त्याचा कुस्ती मल्लविद्येच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
चंद्रपूर येथे नुकतीच राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा पार पडली. यामध्ये पैलवान घोडके याने 19 वर्षे वयोगटात 86 किलो वजन गटांमध्ये उत्कृष्ट खेळ करुन सुवर्णपदकाची कमाई केल्याबद्दल त्याचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी कुस्ती मल्लविद्येचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जपे, शहराध्यक्ष बंडू शेळके, नगरसेवक श्याम नळकांडे, पै. काका शेळके, नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सचिव बाळासाहेब भापकर, वस्ताद युवराज पठारे, बंडू शेळके, अशोक घोडके, अनिल वाणी, राजू म्हस्के, अजय आजबे, बाळासाहेब वाघ, सुनील कदम, शिवाजी कदम आदींसह कुस्तीपटू व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक श्याम नळकांडे म्हणाले की, वस्ताद मंडळी लोपपावत चाललेला कुस्ती खेळ टिकवण्याचे काम करत आहे. शहरासह जिल्ह्यातून अनेक युवा खेळाडू पुढे येत असून, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब भापकर यांनी कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी सर्व मंडळी स्वत:ला झोकून देऊन काम करत आहे. पैलवान घोडके याने शहराचे नाव कुस्ती खेळात उंचावले असून, त्याने केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे सांगितले.
युवराज पठारे म्हणाले की, युवा मल्लांकडून मोठ्या अपेक्षा असून, त्यांनी एका विजयाने हुरळून जाऊ नये व आलेल्या अपयशाने देखील निराश होऊ नये. कुस्ती खेळात यशासाठी सातत्य व कष्ट करण्याची तयारी महत्त्वाची असते. सरावाने मल्ल तयार होत असतो. या मातीतून महाराष्ट्र केसरी घडविण्याचे स्वप्न साकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. डोंगरे म्हणाले की, वस्ताद यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली खेळाडू घडत आहे. शहरातील अनेक कुस्तीपटूंनी राज्यात आपला दबदबा निर्माण केला आहे. शहराला कुस्ती खेळाचा मोठा वारसा असून, हा वारसा टिकवण्याचे काम नवोदित खेळाडू करणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वस्ताद युवराज पठारे यांनी पैलवान घोडके याला 11 हजार रुपयाचे रोख बक्षिस दिले. तसेच यावेळी पै. ओम खंडागळे यांच्या कुस्ती क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल व वस्ताद पठारे यांचा देखील सत्कार करण्यात आला. पैलवान घोडके हा नालेगाव येथील नाना पाटील वस्ताद तालीम मधील मल्ल असून, तो सध्या पारनेरला छत्रपती कुस्ती संकुल मध्ये वस्ताद पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.