हंगाच्या यात्रेनिमित्त रंगल्या महिलांच्या कुस्त्या
अहमदनगर (प्रतिनिधी)- हंगा (ता. पारनेर) गावातील मळगंगा देवीच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती हंगामात नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजू शिंदे, दिपक लंके, सरपंच जगदीश साठे, पिंटू नगरे, मनोहर दळवी, चंद्रकांत काळे, बाळासाहेब दळवी, अशोक साठे, गुंडा भोसले, राजू सोंडकर, सोसायटीचे चेअरमन भाऊ रासकर, गोकुळ शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती हंगामात लाल मातीतल्या कुस्त्या रंगल्या होत्या. चितपट कुस्त्यांच्या थराराने ग्रामस्थांची मने जिंकली. टाळ्यांचा कडकडाट व विजेत्या मल्लांवर रोख बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी महिलांच्या देखील रंगदार कुस्त्या प्रेक्षणीय ठरल्या.
महिला कुस्तीपटू वैष्णवी टकले विरुध्द अक्षता भंडारे यांची कुस्ती आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते लावण्यात आली. ग्रामस्थांनी महिलांच्या कुस्तीचे रंगतदार सामने अनुभवयास मिळाले.